मराठी मनोरंजन विश्वात अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना म्हणून मानसी नाईकने आजवर साऱ्यांची मनं जिंकली आहेत. मानसीने तिच्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. चित्रपटांमध्ये झळकणार्या मानसीने रिऍलिटी शोमधून खरी लोकप्रियता मिळवली. मानसीने एका रिऍलिटी शोच्या विजेतेपदावर आपले नाव पटकावले. विजेतेपद जिंकूनही पुन्हा रिऍलिटी शो करण्याची इच्छा नाही’, असं मानसी नाईकने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. मानसीने नुकतीच अमृता फिल्म या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अमृताने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. (Manasi Naik On Reality Show)
“रिअॅलिटी शोमध्ये विजेता पूर्वनियोजित असतो का? किंवा कोणत्याही प्रकारचा पक्षपात केला जातो का?” असा प्रश्न मानसीला विचारला. यावर उत्तर देत मानसी म्हणाली, “रिअॅलिटी शोमध्ये पक्षपात केला जातो की नाही हे मला खरंच माहिती नाही. कारण, मी जे रिअॅलिटी शो केले तिथे असं काहीच घडलं नव्हतं. मी प्रचंड मेहनत घेऊन प्रत्येक राऊंडमध्ये परफॉर्म केलं होतं. मला ‘हल्लाबोल क्वीन’ हा किताबही मिळाला होता. पण, यापुढे मला कोणताही रिअॅलिटी शो करायची इच्छा नाही”.
मानसी पुढे म्हणाली, “रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्यावर खूप वेगळ्या प्रकारचा तणाव आपल्या डोक्यावर येतो. मी सहभागी झाली होती तो छोट्या पडद्यावरचा एकमेव रिअॅलिटी शो होता ज्यात २० अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. या सगळ्यांमधून पहिल्या क्रमांकावर येणं, ती मेहनत, एपिसोडचं शूट सगळ्याचा तणाव असायचा. प्रत्येकाला या शोच्या नावाप्रमाणे ‘रिअॅलिटी’ समजते”, असंही ती म्हणाली.
“आम्ही तेव्हा रामोजी फिल्मसिटीमध्ये शूटिंग केलं होतं. जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांचं युनिट तिथे काम करत होतं. साडेतीन महिने तिथे एपिसोड्सचं शूटिंग झाल्यावर आमचा महाअंतिम सोहळा मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरला पार पडला होता. या सगळ्यात अभिनेत्रींमध्ये भांडणं, गॉसिप मग, हे गाणं हिलाच का मिळालं? मला का नाही मिळालं? या सगळ्या गोष्टी चालू असायच्या. आम्ही तिघीजणी सोडून इतर सगळ्या अभिनेत्री त्यावेळी मला सीनिअर होत्या. आता मी कोणाचंही नाव घेणार नाही पण या गोष्टी मी पाहिल्या आहेत. कारण भले त्या अभिनेत्री एकमेकींच्या मैत्रिणी होत्या पण त्याठिकाणी प्रत्येकाला जिंकायचं होतं. ती एक प्रकारची स्पर्धा असते आणि प्रत्येकाला पुढे जायचं असतं”, असं मानसीने सांगितलं.