सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे क्रांती रेडकर. क्रांतीने आजवर मराठी चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. याशिवाय लवकरच क्रांती ‘रेनबो’ या आणखी एका मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यापूर्वी क्रांतीने ‘काकण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अभिनयाशिवाय क्रांती सोशल मीडियावरही सक्रिय असते. (Kranti Redkar Visit Akkalkot Temple)
नेहमीच ती तिच्या जुळ्या लेकींचे वा नवऱ्याबरोबरचे किंवा आई-बाबांबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. अभिनयासह ही अभिनेत्री सोशल मीडियावर कंटेंट निर्मिती करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. ती तिच्या लाडक्या लेकींचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील चांगलीच पसंती मिळते. शिवाय क्रांती ही स्वामीभक्त असून अनेकदा स्वामींच्या प्रचितीचे किस्सेही ती सोशल मीडियावरुन शेअर करताना दिसते.
अशातच क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये क्रांती अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घ्यायला गेली आहे. क्रांतीने पतीबरोबरचा हा व्हिडीओ शेअर करत दोघांनी अक्कलकोटच्या स्वामींचे दर्शन घेतले आहे. या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, क्रांती आणि तिचा नवरा समीर अक्कलकोटच्या मंदिरात पूजा करताना दिसत आहेत. स्वामींच्या पादुकांची पूजा करुन त्यांनी स्वामींचे दर्शन घेतलं आहे. क्रांतीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत पसंती दर्शिविली आहे.
“माझी आई स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर सदैव असू देत”, असं कॅप्शन देत दोघेही मनोभावे स्वामींची पूजाअर्चा करताना दिसत आहेत. क्रांती व तिचे पती अनेकदा समाजसेवा करताना दिसतात. शिवाय ते अनेकदा एकत्र सामाजिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतात.