सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी समाजप्रबोधनाचं काम करत असतात. समाजातील गरजू व्यक्तींच्या, अनाथ मुलांच्या, वा रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांच्या मदतीस ते कायम तत्पर असतात. यांत एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे जुई गडकरी. आजवर जुई गडकरीने तिच्या अभिनयशैलीने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याशिवाय जुईचा समाजकार्यातील हातभार पाहता अनेकांनी तिचं कौतुक ही केलं आहे. शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत जुईने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Jui Gadkari Social Work)
जुईने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. कारण यंदाची दिवाळी जुईने आश्रमात साजरी केली आहे. याआधीही जुईने याबाबतची माहिती शेअर करत एक व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. त्यावेळी जुईने या सामाजिक उपक्रमातून आश्रमाला आर्थिक हातभार लावण्यासाठी प्रेक्षकांकडे मदतीचे आवाहन केले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या लोकांनी केलेली आर्थिक मदत जमा करून जुईने धनादेश घेऊन शांतीवन या आश्रमाला भेट दिली, याचा एक व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळतंय की, जुई ही पनवेल येथील शांतीवनला पोहोचली असून तिने शांतीवन मधील ‘रामकृष्ण निकेतन’ या वृद्धाश्रमाला भेट देत सहकार्याचा हात पुढे केला. तसेच ‘कृष्ठरोग निवारण समिती, शांतीवन’ला ही तिने भेट दिली. या व्हिडीओसह जुईने कॅप्शन देत म्हटलं की, “कालचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा होता! तो आमचा “शांतिवन” दिवस होता! शांतीवन आश्रमाशी निगडित होण्याचे हे माझे १९वे वर्ष होते! नेहमीप्रमाणे आम्ही सर्वजण तिथे जमलो, दिवस साजरा केला आणि आश्रमाला एक लाख रुपयांची देणगी दिली आणि हे सर्व माझ्या इन्स्टा परिवाराकडून मिळालेल्या निधीमुळे शक्य झाले.”
“मी फक्त तुम्हा सर्वांची आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद पैसे पाठवल्याबद्दल तसेच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही या सामाजिक कार्यात सहभागी झालात त्या बद्दलही धन्यवाद. चला कुष्ठरोगाशी लढा देऊ आणि त्याचे निर्मूलन करू. याची सुरुवात आपण आपल्या मनापासून करूया.”