Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’ मराठी सिझन ६ च्या घरात सध्या तुफान राडे सुरु असलेले पाहायला मिळत आहेत. पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. चौथ्या दिवशी कॅप्टनसीचा टास्क झाला. या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला. आणि या टास्कदरम्यान कॉमेडी अभिनेता सागर कारंडे आणि तन्वी कोलते यांच्यामध्ये बाचाबाची झाली. तन्वीनं सागरच्या प्रोफेशनवरुन त्याला हिणवलं. आणि त्यानंतर हा चर्चेचा विषय ठरला आहे. सागरला तन्वीने उलट उत्तर केलेलं घरातील स्पर्धकांनाही आवडलं नाही. तन्वीला वयाचा, अनुभवाचा जराही अंदाज नाही आणि ती कोणालाही तोंडाला येईल ते बोलते, असा आरोप प्रेक्षकांनी केला.
प्रेक्षकांपाठोपाठ आता मराठी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम गायत्री दातारनेही तन्वीची शाळा घेतली आहे. एपिसोड पाहिल्यानंतर गायत्रीने एक स्टोरी पोस्ट करत तन्वीला सुनावलं आहे. गायत्रीने पोस्ट शेअर करत तन्वीला म्हटलं, “सागर कारंडे यांना ‘कॉमेडी करतो तू! तुला वाटतं कॉमेडी करतो तू?’ हे तन्वीने विचारणं म्हणजे धोनीला टीममध्ये सिलेक्टही न झालेल्या खेळाडूने खेळात येतं का?, असं विचारणं. एखादया महान कलाकाराचा अपमान करणं हे चूक आहे. आपण कोणाला काय बोलतोय याचं भान राखावं”, असं म्हणत कानउघडणी केली.

सागर-तन्वीमधील नेमका वाद काय?
सागर आणि अनुश्री बोलत असताना तन्वी येते आणि म्हणते, ‘टास्क थांबवलाय’ त्यावर सागर म्हणतो, ‘तू नको सांगू’. तन्वी म्हणते, ‘मी लक्ष ठेवून आहे तुझ्यावर. कॉमेडी करत जातो तू. तुला वाटतं कॉमेडी करतो म्हणून’ तन्वीनं असं बोलताच सागरचा पारा चढतो. सागरचा राग अनावर होतो आणि तो म्हणतो, ‘कॉमेडी माझं प्रोफेशन आहे’. यावर सारवासारव करत तन्वी म्हणते, ‘प्रोफेशनवर बोलले नाहीये मी. तू कॉमेडी करुन भांडण मिटवतो’. सागरही मोठ्याने, ‘कुणाच्या बापाचं खात नाही’ असं म्हणतो. तरीही तन्वी कॅमेरासमोर मोठ-मोठ्याने ओरडते. सर्व स्पर्धकांना तन्वीचं बोलणं खटकतं. करणसुद्धा सागरची बाजू घेऊन ‘तिनं असं प्रोफेशनबद्दल बोलायला नको’ असं म्हणतो.





