सध्या सर्वत्र महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट सुरु होण्याआधी या चित्रपटातील गाण्यांची भुरळ प्रेक्षकांना पडली होती. यामुळेच चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांनां लागून होती.केदार शिंदे दिग्दर्शित असलेला हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. तर या चित्रपटात शाहीर साबळे यांची मुख्य भूमिका अभिनेता अंकुश चौधरी साकारतोय.सध्या अंकुशचं या चित्रपटातील काम पाहून त्याचं सर्वत्र कौतुक होतंय.अशीच सध्या पतीचं कौतुक करत अभिनेत्री दीपा चौधरी हिने देखील पोस्ट केली.(Deepa Chaudhari)
काय म्हणाली दीपा?
दीपाने सोशल मीडियावर अंकुशचे काही भूमिकेतील फोटो शेअर केलेत, २८ एप्रिलला अंकुशचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. खरंतर मी तो एक दिवस आधीच पाहिला होता आणि तेव्हापासून मी पुर्णतः निःशब्द झाले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी मला माझ्या प्रतिक्रिया विचारल्या पण काय बोलू? काय सांगू? कळतच नव्हतं. फक्त अंकुशची बायको म्हणूनच नव्हे तर एक कलाकार म्हणून, एक सुजाण प्रेक्षक म्हणून ह्या कलाकृतीने मला खूप काही दिलं, शिकवलं, घडवलं आणि मुख्य म्हणजे माझ्याच माणसांची मला नव्याने ओळख करुन दिली.
बायको म्हणून मला अंकुशचा खूप खूप खूप अभिमान वाटतो. आज फक्त त्याची बायको म्हणून नाही तर त्याची फॅन म्हणून सुद्धा मी पुन्हा एकदा नव्याने त्याच्या प्रेमात पडले. ह्या चित्रपटासाठी एक अभिनेता म्हणून त्यांनी घेतलेल्या मेहनतीची मी स्वतः साक्षीदार आहे.‘याची देही याची डोळा’ ज्यांना बघत, ज्यांच्या सहवासात त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली त्यांचीच भूमिका आज साकारायला मिळणं यासारखा दुग्धशर्करा योग नव्हे. आणि यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे बळ कदाचित बाबांकडून त्यांना मिळाले असावे. चित्रपट बघताना काही क्षणानंतर अंकुश चौधरी दिसतच नाही आणि दिसतात ते पूर्णतः शाहीर साबळे.
अभिनेता म्हणूनच नव्हे तर वास्तविक आयुष्यात क्षणिक का होई ना पण तुम्ही ही भूमिका आत्मसात करत ती जगलात हेच एक अभिनेता म्हणून तुमचं यश आहे. आणि म्हणूनच आज महाराष्ट्र दिनानिमित्त मी महाराष्ट्रतील सर्व रसिक प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहण्याची मी विनंती करते. असं म्हणत तिने तिच्या भावना व्यक्त केल्यात तर चाहत्यांनी देखील तिच्या पोस्टला सहमती देत कमेंटचा वर्षाव केला.(Deepa Chaudhari)