महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे बैलगाडा शर्यतीची. अनेक वेळा प्रेक्षकांनी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक यांच्याकडे बैलगाडा शर्यतीवर चित्रपट करण्याची मागणी केली आहे. प्रेक्षकांची ही मागणी आता पूर्ण होताना दिसत आहे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांनी ही जबाबदरी आपल्या खांद्यावर घेतल्याचे पाहायला मिळते. अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू अभिनित ‘ खिल्लार’ या बैलगाडा शर्यतीवर आधारित चित्रपटाची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली.(Khillar New Marathi Movie)

कागर, यंग्राड, सोयरीक, अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांचं दिगदर्शन मकरंद माने यांनी केले आहे. तसेच मकरंद माने यांनी दिग्दर्शित केलेला रिंगण हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला होता. स्वतः पश्चिम महाराष्ट्रातून असल्यामुळे बैलगाडा शर्यतीचा थरार काय असतो हे मकरंद यांनी जवळून पाहिलं आहे. त्यामुळेच आता हा विषय तो ‘खिल्लार’ चित्रपटातून मांडत आहे. रिंकू राजगुरूनं कागर या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्यामुळे मकरंद आणि रिंकू पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. तर मकरंद आणि रिंकू यांच्याबरोबर ललित प्रभाकर पहिल्यांदाच काम करत आहे.(Khillar New Marathi Movie)

न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थेतर्फे ‘खिल्लार’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव मावळ इथं झालेल्या पुणे जिल्हा केसरी भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीवेळी ‘खिल्लार’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तसंच चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं. येत्या काही दिवसांत चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपटाची कथा, कलाकार आदी तपशील टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येईल.
चित्रपटाविषयी मकरंद माने म्हणाला, की बैलगाडा शर्यतीचा विषयच अगदी जिव्हाळाचा आहे. महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ पडद्यावर रंगवताना ‘खिल्लार’मधून मैदान जोरदार रंगणार माझी खात्री आहे.