chhaya kadam filmfare emotional : मनोरंजनविश्वातील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा ७० वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच गुजरात येथे पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूडसह आपल्या मराठी कलाकारांची उपस्थिती देखील दिसली. या सोहळ्यात मराठी कलाकारांच्या उपस्थितीने साऱ्यांची मन जिंकली. शाहरुख खान आणि करण जोहर यांनी हा सोहळा रंगतदार पद्धतीने होस्ट केला. या सोहळ्यात किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने अक्षरशः बाजी मारली. याच चित्रपटासाठी मराठमोळी छाया कदम हिला ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
‘लापता लेडीज’मध्ये त्यांनी साकारलेल्या ‘मंजू माई’ या दमदार भूमिकेसाठी त्यांना हा सन्मान मिळाला. पहिलाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने छाया कदम अत्यंत भावुक झाल्या. हा त्यांच्या आयुष्यातील आठवणीचा क्षण रहिला. भावना व्यक्त करत त्या म्हणाल्या “प्रत्येक वेळी असं वाटायचं की, आता मला पुरस्कार मिळेलच. सगळे कौतुक करायचे पण पुरस्कार काही केल्या मिळत नव्हता. पण यावेळी ठरवलं होतं, अवॉर्ड मिळो किंवा न मिळो, आपण मस्त तयार होऊन या सोहळ्याला जायचंच. हा पुरस्कार त्या सगळ्यांसाठी आहे जे इंडस्ट्रीत अनेक वर्षे काम करत आहेत आणि नेहमी विचार करतात, कधी होणार? कधी पुरस्कार मिळेल? मेरा टाइम कब आएगा? त्या सगळ्यांसाठी हा पुरस्कार आहे”.
आणखी वाचा – सततच्या केसगळतीला त्रासले आहात का?, हे सोप्पे घरगुती उपाय करतील ‘या’ त्रासातून मुक्त, जाणून घ्या…
छाया कदम पुढे म्हणाल्या “यानिमित्ताने माझं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं. मी शाहरुख खानला भेटले!”. यादरम्यान मंचावर उपस्थित असताना भारावलेल्या छाया कदम यांना शाहरुख खानने स्वतः मिठी मारली आणि धीर दिला. इतकंच नाहीतर कौतुकाने “गॉड ब्लेस यू” म्हणत त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. आणि त्यानंतर शाहरुखने केलेल्या कृतीने साऱ्यांचं मन जिंकलं. किंग खानने स्वतः छाया यांना मंचावरुन खाली नेऊन सोडलं.
आणखी वाचा – आई होण्यासाठी PCOD आड येतंय?, PCOD/PCOS च्या ‘या’ समस्येतून बाहेर पडायचं असेल तर काय कराल?, जाणून घ्या…
या मनस्पर्शी क्षणाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून छाया कदम यांच्यावर भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या मराठी कलाविश्वात छाया यांच्या या आनंदाच्या बातमीने सारेच भावुक झाले आहेत.





