दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आजही येते. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीदेखील त्यांची आठवण काढत असतात. अनेक कलाकार मंडळी लक्ष्मीकांत बेर्डेंविषयीची आठवण काढत त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से व आठवणी सांगत असतात. अशातच अश्विनी भावे यांनीही नुकतीच लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दलची एक आठवण सांगितली असून ते खूप लवकर गेले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अश्विनी भावे यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली.
यावेळी अश्विनी भावे यांना काही जून फोटो दाखवण्यात आले. यात त्यांना लक्ष्मीकांत बेर्डेंचा फोटो दाखवण्यात आला. तेव्हा त्यांच्याविषयी बोलताना अश्विनी भावे असं म्हणाल्या की, “लक्ष्या हा असा एक कलाकार आहे जो केवळ उत्तम कलाकारच नाही तर एक सहृदयी माणूसही होता. त्याने कधीच कुणाचं उणधुणं काढलं नाही. म्हणजे मी तरी ऐकलं नाही आणि त्याने कधीही सेटवरचं वातावरण तंग होऊ दिलं नाही”.
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “आमच्या क्षेत्रात असे खूप प्रसंग येतात. जिथे कायम टेंशनच असतं. एका तणावाखालीच सगळेजण काम करत असतात. त्यावेळी लक्ष्मीकांतसारखा माणूस सेटवर असला तर कायम सकारात्मकता असयाची. तो खरंच खूप उत्तम अभिनेता व उत्तम माणूस होता. पण तो खूप लवकर गेला”. तसेच या मुलाखतीत त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय व सौंदर्याने अश्विनी भावे यांनी ८०-९०चा काळ गाजवला. ‘शाब्बास सूनबाई’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’, ‘वजीर’ ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘ध्यानीमनी’सारख्या अनेक मराठी व ‘जखमी दिल’, ‘मोहब्बत की आरजू’, ‘बंधन’सारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांत काम करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अश्विनी व दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनीही अनेक एकत्र चित्रपट केले. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’सारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.