गेल्या काही वर्षांपासून मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार राजकारणाकडे वळली आहे. मेघा धाडे, अभिजीत केळकर, हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, प्रभाकर मोरे यांसारखे अनेक कलाकार नुकतेच राजकीय पक्षात प्रवेश करताना दिसले आहे. तर अमोल कोल्हे, दीपाली सय्यद, प्रिया बेर्डे व अन्य काही कलाकार मंडळी आधीपासून राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. (Priya Berde on artist Political Entry)
ज्यांनी आपल्या अभिनयाने नव्वदीचा काळ गाजवला आहे, त्या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रिया बेर्डे. प्रिया बेर्डे गेली अनेक वर्ष चित्रपट, मालिका, नाटकांमधून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आल्या आहेत. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यांनी साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. मनोरंजनसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्री सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत दिसत असून मालिकेच्या निमित्ताने त्यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.
अभिनयाबरोबर प्रिया बेर्डे या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे. २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. कोरोना काळात त्यांनी अनेक कलाकार व तंत्रज्ञांची मदतदेखील केली होती. त्यांच्या विविध मागण्यासाठी त्यांनी लढादेखील दिला. पण, पक्षातील मतभेदामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडली व भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या त्या भाजप सांस्कृतिक प्रकोष्टच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत. (Priya Berde Political Career)
सौमित्र पोटे यांच्या ‘मित्रम्हणे’ या युट्युब पॉडकास्टमध्ये प्रिया बेर्डे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी कलाकारांनी राजकारणात प्रवेश करण्यामागे काय कारण आहे, याबद्दल त्या व्यक्त झाल्या. प्रिया यांना मराठी कलाकारांना राजकारणात प्रवेश करावासा का वाटतो? असा प्रश्न सौमित्र पोटे यांनी विचारला असता त्या म्हणाल्या, “हे आतापासून सुरु नाही, हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून सुरुवात झाली आहे. शाहू महाराजांनी कलेला आणि कलाकारांना राजाश्रय दिला आणि कलाकारांना गरज त्याची थोडीफार हवी आहे. आताच्या काळात खूप जास्त आहे, कारण आपला सांस्कृतिक विभाग किंवा आपली मनोरंजन सृष्टी ही फार दुर्लक्षित झाली आहे, असं माझं म्हणणं आहे. कलाकारांना ज्या पद्धतीने मान-सन्मान मिळाला पाहिजे, ती अजून मिळत नाही. अद्यापही आपल्याला चित्रपटगृहात चित्रपटाचे शोज मिळावे, यासाठी लढावं लागतं. नाट्यगृहाच्या स्वच्छतेसाठी लढावं लागतं. वृद्ध कलावंतांच्या पेन्शनसाठी भांडावं लागतं, निवेदने द्यावी लागतात. त्यामुळे आपल्या मनोरंजन सृष्टीची स्थिती जैसे थेच आहे.”
हे देखील वाचा – ‘मला ट्रोल करा, बेर्डे साहेबांना बोलण्याचा काय अधिकार आहे तुमचा’ म्हणत प्रिया बेर्डे संतापल्या
प्रिया यांना यामध्ये बदल करायची प्रचंड इच्छा आहे. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “मला हे सर्व बदलायचं आहे. कारण, तामिळ, तेलगू, भोजपुरी सृष्टीप्रमाणे आपल्या चित्रपटसृष्टीला दर्जा नाही, त्यामुळे आपल्या कलाकारांना कर्ज मिळत नाही. कोरोना काळात ज्या कलाकार व तंत्रज्ञांना इतर व्यवसाय करायचा होता, त्यांना कुणी कर्ज दिलं नाही. हाच दर्जा जर आपल्या चित्रपटसृष्टीला मिळाला, तर कलाकारांच्या मानधनाच्या ज्या काही अडचणी असतील, त्या सरकार दरबारी जाऊन सोडवू शकतील. अश्या बऱ्याच गोष्टी मला भविष्यात करायच्या आहेत, ज्याचे खूप फायदे आहेत. हे सर्व करण्यासाठी मी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.”, असे प्रिया बेर्डे या मुलाखतीत म्हणाल्या.