सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच आता आणखी एका मराठमोळ्या कलाकार जोडीने त्यांच्या लग्नाची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. ही जोडी म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुळी मालिकेतील अभिनेत्री तितीक्षा तावडे. तितीक्षा लवकरच अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह विवाहगाठ बांधणार आहे. सध्या या जोडीची सर्वत्र विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. (Titeeksha Tawde And Siddharth Bodke)
सिद्धार्थ बोडकेबरोबर तितीक्षा लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. याचा खुलासा त्यांनी ८ फेब्रुवारीला केला. अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे पहिल्या केळवणाचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली देत आनंदाची बातमी दिली. तितिक्षा तावडेने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबरचा फोटो पोस्ट केला. या फोटोत ते दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसत आहेत. या पोस्टला कॅप्शन देत तितिक्षा म्हणाली, “त्याने मला डेटसाठी विचारलं आणि आमच्या या सुंदर डेटचं केळवणात रुपांतर झालं” असं म्हणत थेट केळवणाचे फोटो शेअर करत दोघांनी प्रेमाची कबुली दिली.

त्यांच्या या केळवणानंतर आणखी एका खास केळवणाचे फोटो समोर आले आहेत. अभिनयासह हॉटेल क्षेत्रात कार्यरत असणारी अनघा अतुल हिने नुकतंच तितीक्षा व सिद्धार्थ यांच्या केळवणाचा घाट घातलेला पाहायला मिळाला. अनघाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोघांचा एकत्र फोटो पोस्ट करत ‘केळवण, पाहुणे’ असं म्हटलं आहे.
तितिक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके हे दोघेही एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘असे हे कन्यादान’ या मालिकेत ते दोघे एकत्र झळकले होते. त्यानंतर दोघेही ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेतही एकत्र दिसले. त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. आता या दोघांनी थेट लग्नाची घोषणा केली आहे.