आपलं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी हवी ती धडपड करण्यास आपण तयार असतो. सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकारांच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. कलाकारही हक्काच्या घरासाठी धडपड करताना दिसतात. नवं घर खरेदी केल्यानंतर त्यामागचा स्ट्रगल सांगताना त्यांच्या डोळ्यांतून त्यांनी किती कष्ट केले असतील हे दिसून येतं. येत्या काही वर्षांत बऱ्याच कलाकारांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताने तिचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहिलं. आता तिने तिचं स्वप्नही पूर्ण केलं आहे. पण त्यामागचा तिचा स्ट्रगल आणि कठीण दिवस याबाबत अमृताने सांगितलं आहे. (amruta khanvilkar home)
अमृताने तिच्या युट्युब चॅनलद्वारे घराच व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने तिच्या घराची गोष्ट सांगितली आहे. त्यासाठी तिला करावा लागलेला स्ट्रगल दिसून येतं. घर घेणं अमृतासाठी काही सोपी गोष्ट नव्हती. घर बूक केल्यानंतर लगेचच आईचं आजारपण उभं येऊन ठाकलं. आजरपणही अगदी छोटं-मोठं नव्हे तर थेट हृदयावर शस्त्रक्रिया. मात्र या सगळ्या अग्निपरीक्षेतून बाहेर येत तिने स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं.
आणखी वाचा – धक्कादायक! सात वर्षांनी आयुष्मान खुरानाच्या बायकोला पुन्हा एकदा कॅन्सर, हसत म्हणाली, “हा दुसरा राऊंड…”
‘चंद्रमुखी’ करुनही पैसे नव्हते
अमृता म्हणाली, “मला अजूनही आठवतंय की, माझं आणि हिमांशूचं एक दुसरं घर होतं. आयुष्याच्या एका टप्प्यावर आम्हाला ते घर भाड्याने द्यावं लागलं. त्यानंतर मला असं झालं होतं की, पुन्हा दुसरं घर नकोच. भाड्याच्याच घरात आता राहुयात असा विचार केला होता. मी अगदी तीन वर्ष भाड्याच्या घरातही राहिले. तेव्हा माझ्याकडे काहीही नव्हतं. ‘चंद्रमुखी’ प्रदर्शित होऊनही पन्नास एक दिवस उलटले होते. पण खरं सांगते तुम्हाला आमच्याकडे पैसेच नव्हते. आपल्या घराचं जे स्वप्न असतं ते पाठलाग सोडत नाही. घर घेणं खूपच अवघड आहे. का तेही मी तुम्हाला सांगते”.
घराचा भार आणि आईचं आजारपण
“गेल्याच वर्षी मी हे घर बूक केलं. त्याचवेळी आईचं हृदयाचं ऑपरेशन करावं लागलं. त्याशिवाय आईबाबत आपण हळवे असतो. आपण घर घेतलं आहे आणि आईला ओपन हार्ट सर्जरी करावी लागत आहे. तर आपलं कुठे चुकलं आहे का? असेही विचार मनात आले. पण झालं यार सगळं नीट. आमची iron lady या सगळ्यामधून बाहेर आली. घराची चावीही हाती आली. वेळेच्या आधी घर हातात मिळालं. नाहीतर एवढ्या लवकर मुंबईत कुठे घर मिळतं?. योगा करत असताना मॅटवर मला घराचं नाव सुचलं आणि ते नाव होतं ‘एकम’. एक म्हणजे माझ्या घराच्या नंबरची एकूण टोटलही एक आहे”. अमृताच्या जिद्दीचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे.