जन्म देण्यापासून ते अगदी पुढे जाऊन आपल्या आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापर्यंत आपल्या पाठीशी कायम उभी राहणारी व्यक्ती म्हणजे आई. आई ही व्यक्ती आपल्या आयुष्यात सगळ्या भूमिका निभावत असते. त्यामुळे आई हीदेखील एक गुरूच आहे. कालच्या गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांनी आपल्या गुरुंप्रती आदर व प्रेम व्यक्त करत फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरनेदेखील तिच्या आयुष्यातील गुरुंप्रती प्रेम व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली होती. मात्र यावेळी तिने लिहिलेल्या एका पोस्टमध्ये तिच्या आईबद्दल एक खुलासा केला.
अमृताने गुरुपौर्णिमेनिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला. ज्यात तिने तिच्या आईवर मोठी शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आई घरी परतल्याचा एक अतिशय हळवा व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं की “गेले दोन महिने माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी प्रचंड अवघड होते. माझी आईची ५ तारखेला open heart surgery करण्यात आली. तिला कुठल्याही प्रकारचा अटॅक किंवा कसलाही जीव घेणा त्रास झाला नाही. आईला होणारा त्रास आम्हाला योग्यवेळी ओळखता आला आणि त्यावर योग्य तो उपचार करता आले, यात फक्त आणि फक्त स्वामींची कृपा होती”.
यापुढे तिने असं म्हटलं की, “आई आता बरी होत आहे आणि प्रत्येक स्त्री ही खऱ्या अर्थाने खंबीर असते हे दाखवून देत आहे. आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पुनश्च – ही संधी साधून घडलेली ही घटना सर्व मुलांना आणि पालकांना सांगायची आहे की, कृपया तुमच्या कुटुंबातील कोणालाही किंवा त्यांच्या आरोग्याला गृहीत धरू नका. ३ वर्षांपूर्वी मी माझा एक मौल्यवान व्यक्ती गमावला. माझी आई कधीच दवाखान्यात भरती होऊन अर्धा दिवसही राहिलेली नाही आणि आतापर्यंत तिला आरोग्याच्या कुठल्याच समस्यांमधून कधी जावे लागले आणि अचानक तिच्यावर इतकी मोठी शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे तुम्हीदेखील कुटुंबियांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका”.
आणखी वाचा – मेहनत केल्यास यश हमखास, आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच लाभदायक आहे, जाणून घ्या…
तसेच या पोस्टमध्ये अमृताने तिच्या आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, तेथील कर्मचाऱ्यांचे आभार मानत असं म्हटलं आहे की, “तिथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबाचे मी आभार मानू इच्छिते. माझ्यामागे सावलीप्रमाणे उभे राहिलात. मला आधार दिला.. मला खंबीर ठेवलेत. तुम्ही माझ्यासाठी देवदूत आहात.माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे”.