अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. अमृता-प्रसादच्या विवाहसोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. लग्नानंतर हे जोडपं पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या अमृता तिच्या नाटकविश्वात पुन्हा व्यस्त झाली आहे. अमृताने याआधी मालिकाविश्व व नाटकविश्व बरंच गाजवलं आहे. प्रसाद व अमृता ही जोडी ‘बिग बॉस’च्या घरामुळे विशेष चर्चेत आली. (Amruta Deshmukh Mother Post)
सध्या अमृता ‘नियम व अटी लागू’ नाटकाचे प्रयोग करण्यात व्यस्त आहे. ‘नियम व अटी लागू’ नाटकाचे सर्वत्र प्रयोग सुरु असून या प्रयोगांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. या नाटकात अमृता देशमुख व संकर्षण कऱ्हाडे मुख्य भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान ची एक कौतुकास्पद बाब समोर आली आहे. अमृताने बरं नसताना अंगात १०० ताप असताना नाटकाचा प्रयोग केला. याबाबत तिचं कौतुक करणारी पोस्ट तिच्या आईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेकीचं कौतुक केलं आहे.
अमृताच्या आईने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “The show must go on प्रत्येक कलाकारासाठी हे ब्रीदवाक्य असतं. पण प्रत्यक्षात हे किती कठीण असतं ते ज्याच्यावर ती वेळ येते त्यालाच ठाऊक असतं. अंगात १०० ताप, दोन वाक्य बोललं की येणारा खोकला, तापामुळे आलेला अशक्तपणा, पुरेशी न झालेली झोप आणि त्यात प्रवास. या अशा परिस्थितीत अमृताने नियम व अटी लागू या नाटकाचे तीन दिवसांत सलग ४ प्रयोग केले. त्यातला पहिला प्रयोग बोरिवली व नंतरचे पुण्यात झाले” असं म्हटलं.
यापुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “प्रसाद, आम्ही सगळे व डॉक्टर तिच्या पाठीशी होतोच पण ज्या जिद्दीने तिने हे प्रयोग केले त्याला तोड नाही. कदाचित प्रेक्षकांच्याही लक्षात आलं असेल तिचं आजारपण पण त्यांचा मिळणारा जिवंत प्रतिसाद हेच तिचं खरं आत्मबळ होतं. आम्हाला तुझा अभिमान आहे. लवकर बरी हो आणि पुन्हा जोमाने रंगमंच गाजवायला सज्ज हो” असं म्हणत लेकीचं भरभरून कौतुक केलं. त्यांच्या या पोस्टवर अमृताच्या अनेक चाहत्यांनी कौतुकास्पद कमेंट केल्या आहेत.