मराठी मालिका, जाहिराती, चित्रपट, नाटकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. गेल्या दशकभरापासून त्यांनी आपल्या अभिनय व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सोशल मीडियावरदेखील त्या चांगल्याच सक्रिय असतात. सोशल मीडियावर आपले मनमोहक व दिलखेचक फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्याचबरोबर पती अविनाश नारकर यांच्याबरोबरचे हटके डान्स व्हिडीओदेखील ते शेअर करत असतात. सोशल मीडियावर ही जोडी कायमच चर्चेत असते. अशातच नुकताच त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. (Aishwarya Narkar Shared Video On Instagram)
ऐश्वर्या यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर आताचे काही नवीन फोटोदेखील शेअर केले आहेत. पल्लवी, ऐश्वर्या ऐश अशा तीन वेगवेगळे फोटो त्यांनी यात शेअर केले आहेत. त्याचबरोबर या व्हिडओखाली त्यांनी हटके कॅप्शन देत असे म्हटले आहे की, “माझ्या आई-बाबांनी मला एक खेळकर, प्रेमळ व अप्रतिम बालपण दिले. यासाठी मी त्यांची कायम ऋणी राहीन. ते माझ्याबरोबर कायम असतात. मी आज जे काही आहे ते फक्त माझ्या आई-वडिलांमुळेच आहे.”
ऐश्वर्या यांना स्वत:चे छान फोटो काढण्याची आवड आहे आणि ही आवड त्यांच्यात आई-वडिलांमुळेच आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचा उल्लेख करत त्यांनी असं म्हटलं आहे की, “माझ्यासारखेच माझे आई-बाबांनादेखील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची आवड होती. त्यांच्या या आवडीमुळेच माझ्याकडे लहानपणीचे अनेक फोटो आहेत.” ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या त्यांच्या लहानपणीच्या फोटोतदेखील त्या आता इतक्याच खुपच सुंदर दिसत आहे.
आणखी वाचा – अखेर रणदीप हुड्डा व लीन लैश्राम यांचा विवाहसोहळा संपन्न, लक्षवेधी पोशाख, पारंपरिक विधीने वेधले लक्ष
दरम्यान त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी त्यांच्या लहानपणीच्या फोटोला पसंती दाखवली आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. अनेक चाहत्यांनी “तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, लहानपणीसुद्धा तुम्ही इतक्या सुंदर दिसत होतात?, तुम्ही खुपच गोड आहात, मला तुमचे लहानपणीचे फोटो बघायचे आहेत” अशा अनेक कमेंट्स करत त्यांच्या या फोटोचे कौतुक केले आहे.