आजकाल कलाकार मंडळी त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. बरेचदा ही कलाकार मंडळी योग, जिमचे अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सोशल मीडियाच्या या जगात ही कलाकार मंडळी नेहमीच सतर्क असून त्यांच्या चाहत्यांसह फिटनेसबाबतचे व्हिडीओ शेअर करत असतात. सुरुवातीच्या काळात फिटनेसची क्रेझ तितकी नव्हती त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कलाकार प्रयत्नही करताना दिसत नसत. मात्र आता हे चित्र बदललं असून कलाकार मंडळी स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत. (Aarti Solanki On Fitness)
विशेषतः अभिनेत्रींमध्ये हे चित्र अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. अशा बऱ्याच अभिनेत्रींची उदाहरणे डोळ्यासमोर आहेत ज्यांनी आजवर त्यांच्या वजनात घट केली आहे. या अभिनेत्रींमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव आवर्जून घेतले जाईल ते म्हणजे आरती सोळंकी. तब्बल ६१ किलो वजन कमी करत या आरतीने वजनाचा रेकॉर्डच ब्रेक केला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आरतीने स्वतःमध्ये केलेल्या या बदलामुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
नाटक, मराठी चित्रपट, मालिका यांमधून आजवर आरतीने तिच्या अभिनयाची छाप सोडली. अनेक अडचणींचा सामना करत खचून न जाता अगदी जिद्दीने तिने तिचा हा प्रवास पूर्ण केला. याबाबतची ऑफिशिअल पोस्ट तिने सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केली होती. यानंतर आरतीने शेअर केलेल्या आणखी एका इन्स्टाग्राम पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमध्ये “१३२ किलो ते ७१ किलो पर्यंतचा प्रवास. २०२१ ते २०२४. श्री स्वामी समर्थ”, असं कॅप्शन देत तिने फरक दाखवणारे काही फोटोही पोस्ट केले आहेत.
अनेकदा कलाकार मंडळींना त्यांच्या वजनावरून ट्रोल केलं जातं. या ट्रोलिंगच्या कचाट्यात आरती सोळंकीही बरेचदा अडकली. मात्र आरतीने या ट्रोलिंगला उत्तर देत थेट वजन कमी केलेलं पाहायला मिळत आहे. आरतीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.