मराठी मालिकाविश्वातील प्रेक्षकांचा लाडका आणि नावारुपाला आलेला चेहरा म्हणजे अभिनेता विकास पाटील. ‘बिग बॉस’मराठीच्या तिसऱ्या पर्वातही विशाल दिसला. या शोमुळे अभिनेत्याला खऱ्या अर्थाने अधिक लोकप्रियता मिळाली. विकासने याशिवाय बऱ्याच मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांची मन जिंकली. चित्रपट, मालिका या क्षेत्रात काम केल्यानंतर आता विकास पुन्हा एकदा रंगमंचाकडे वळला आहे. विकास हा सोशल मीडिया अकाऊंटवरुन कमालीचा ऍक्टिव्ह असतो. (Vikas Patil Post)
अभिनेता नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या पोस्ट कायम शेअर करत असतो. विकास सध्या देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल दि बेस्ट’ नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. या नाटकाला धरुन विकासने केलेली एक पोस्ट सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विकासचं ऑल दि बेस्ट हे नाटक त्याची पत्नी स्वातीने ४० प्रयोगांनंतर पाहिलं. यासंदर्भात अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
नाटकानंतर बायकोबरोबरचा एक खास फोटो शेअर करत विकासने पोस्ट शेअर केली आहे. “अखेर मॅडमने काल माझं नाटक पाहिलं. तुझं नाटक सेट होऊ दे मग मी बघेन असं म्हणत ४० प्रयोगांनंतर ती नाटक पाहायला आली. अरे तुझी बायको कधी येणार नाटकाला असं विचारून सगळेच थकले आणि मी त्यांना उत्तरं देऊन थकलो. अखेरीस तिने नाटक पाहिलं. खूप मनापासून एन्जॉय केलं. पोट धरून हसली आणि शेवटी डोळ्यांत पाणीही तरळलं”.
पुढे त्याने असेही लिहिलं आहे की, “सगळं जग बघून गेलं तरी जोपर्यंत आपली माणसं आपलं काम बघत नाहीत आणि त्यांना ते कसं वाटलं हे कळत नाही तोपर्यंत काही मज्जा नाही राव. काय म्हणता बरोबर ना ?”. विकासच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.