मराठी नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. बालवयातच तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर ‘मुन्नाभाई MBBS’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रीला दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पुढे, प्रियाने छोट्या पडद्याद्वारे आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. त्यानंतर ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’ अशा लोकप्रिय चित्रपटांमधून तिने आपला सशक्त अभिनय केला आहे. नेहमीच विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या प्रियाने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. (Priya Bapat Birthday Video)
प्रिया बापटच्या या वाढदिवसानिमित्त मराठी कलाविश्वासह बॉलिवूडमधील अनेक कलाकार व चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. तिने वैयक्तिक आयुष्यात २०११ मध्ये अभिनेता उमेश कामतशी लग्न केलं. या दोघांची जोडी नेहमीच चर्चेत असते. बायकोच्या वाढदिवसानिमित्त उमेशने एक खास पोस्ट शेअर करत प्रियाला शुभेच्छा दिल्या. “प्रिया, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मला तुझ्यासारखं योग्य शब्दात व्यक्त होता येत नसलं आणि अचूक शब्दात कौतुक करता येत नसलं तरी, तुला माहीत आहे. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि मला तुझं किती कौतुक आहे”.
यानंतर आता अभिनेत्याने बायकोसाठी खास सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. उमेशने प्रियाच्या वाढदिवसानिमित्त एका खोलीत खास फुग्यांचे डेकोरेशन केले असून तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच तिच्यासाठी खास खाण्याच्या गोष्टीही केल्या आहेत, यावेळी अभिनेत्याने खास केकही ठेवला असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. प्रियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला असून या व्हिडीओला तिने ‘तू है तो’ हे गाणं लावलं आहे.
तसंच या व्हिडीओसह तिने असं म्हटलं आहे की, “माझे हृदय दररोज तुझ्यासाठी ‘तू है तो’ हेच गाते. मी तुला माझे आयुष्य बनवल्याबद्दल देवाचे आभार मानावे तितके कमी आहेत. माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे आणि हे तुलाही माहीत आहे.” दरम्यान, नवऱ्याने दिलेल्या या खास भेटीमुळे अभिनेत्री प्रिया बापट खूप भावुक झाली असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.