२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी एक सोहळाच होता. रामाच्या या प्राणप्रतिष्ठापनेसाठी भाविकांसह अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यानंतर आता एका मराठमोळ्या अभिनेत्यानेही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने अयोध्येतील राम मंदिराची भेट घेतली. यावेळी त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. याबद्दल स्वप्नीलने आपल्या भावना व्यक्त करत त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. (Swapnil Joshi Visit Ram mandir)
स्वप्नीलने राम मंदिराच्या भेटीदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्याने हा खास व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत असे म्हटलं की, “२२ जानेवारी २०२४ हा दिवस माझ्यासाठी सगळ्यांसाठी अत्यंत भावनिक होता, प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा असा होता. प्रभू श्री रामांचं अयोध्या नगरीमधील पुनरागमन, तो उद्घाटन सोहळा ते सगळंच अतिशय भारावून जाण्यासारखं होतं. तेव्हा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला नाही पण एक मात्र ठरवलं होतं ‘याची देही याची डोळा’ प्रभू श्री रामचद्रांचं दर्शन मात्र नक्की घ्यायचं. काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाण्याचा योग जुळून आला. आणि यावेळी माझा मित्र माझ्याबरोबर होता”.
पुढे त्याने भावना व्यक्त करत म्हटलं की, “आम्हा दोघांना आणि इतर काही मित्रमंडळींना प्रभूंच्या दर्शनाचं सौभाग्य लाभलं. प्रभुंचं दर्शन, सरयु नदीची आरती, हनुमान गढीचं दर्शन, अयोध्येतलं ते प्रसन्न वातावरण, ती सकारात्मकता सगळं सगळं मनाला फार उत्साह आणि ऊर्जा देणारं होतं. हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव इथे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे आज शब्द नाहीत, पण सरतेशेवट याचसाठी केला होता अट्टाहास असं वाटलं. प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो हीच प्रार्थना”.
स्वप्नील जोशीने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज या माध्यमांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा मिळवली. स्वप्नील हा अनेक तरुणाईच्या गळ्यातील ताईद आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार आहे. सोशल मीडियावरही स्वप्नील नेहमीच सक्रिय असतो.