मालिका, चित्रपट व सीरिज या माध्यमांमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनयाबरोबर ती उत्तम कवयित्री, निवेदक, व्यावसायिका आणि निर्मातीही आहे. अनेक क्षेत्रात वावर असलेली ही बहुगुण संपन्न अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून एका कारणाने चर्चेत आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना प्राजक्ता माळींसह काही अभिनेत्रींची नावं घेतली. ज्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे. प्राजक्ताचं नाव घेतल्यामुळे हे प्रकरण खूप चिघळलं असून या प्रकरणी आता प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचललं आहे. (Sushant Shelar support to Prajakta Mali)
प्राजक्ताने या संपूर्ण प्रकरणी सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. तसंच काल (शनिवार) प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत याबाबत तिचं मत मांडलं. यावर आता मराठी कलाविश्वतून अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक-लेखक सचिन गोस्वामी, निर्माते नितीन वैद्य, अभिनेत्री मुग्धा गोडबोले व नृत्यांगना गौतमी पाटीलने प्राजक्ताला पाठींबा दिला आहे. त्यानंतर आता मराठी अभिनेता सुशांत शेलारनेही अभिनेत्रीला पाठिंबा दर्शवला आहे.
आणखी वाचा – “फक्त नेत्याबरोबरच नाही तर…”, प्राजक्ता माळीबद्दल गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली, “एका कलाकाराचं दु:ख…”
सुशांतने सोशल मीडियावर प्राजक्ताचा फोटो शेअर करत तिच्यबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने असं म्हटलं आहे की, “कालपासून सगळ्या न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावरती एका वाचाळवीराकडून ‘महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री प्राजक्ता माळी’ यांच्याबद्दल जी खालच्या पातळीची टीका होत आहे, त्याचा मी कठोर शब्दांत निषेध करतो. अशा पद्धतीने कुठल्याही महिला कलाकाराला राजकारणात खेचून खालच्या पातळीवर टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”.
आणखी वाचा – “ज्या समाजात महिलांचा…”, प्राजक्ता माळीबद्दल सचिन गोस्वामींची प्रतिक्रिया, म्हणाले, “जे घडत आहे ते…”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “अशा काही वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण दुषित झाले आहे. त्यांना वेळीच आळा घातला पाहिजे. मी एक कलाकार म्हणून प्राजक्ता माळी यांच्यासोबत आहे”. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, वस्तुस्थिती मांडून कठोर कारवाई मागणी करणार असल्याची माहिती प्राजक्ताने २८ डिसेंबरच्या पत्रकार परिषदेत दिली. तसंच कोणत्याही पुराव्याशिवाय ज्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत, त्यावर अभिनेत्रीने संताप व्यक्त केला.