कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात नेमकं काय चाललंय, हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना फार आवडत. बरेचदा ही कलाकार मंडळी आपल्या खासगी आयुष्यात काय चाललंय, हे सांगायला तयार नसतात. बऱ्याच गोष्टी ते लपूनछपून करतात, मात्र बरीच कलाकार मंडळी अशी आहेत जी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने सोशल मीडियावर भाष्य करतात. अशातच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर यांनी देखील त्यांच्या खासगी आयुष्यातील आनंदाचे क्षण सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. (Siddharth Chandekar On Seema Chandekar)
सिद्धार्थ चांदेकर त्याच्या आयुष्यातील सकारात्मक प्रसंगामुळे चर्चेत आला आहे. आणि त्याच्या या कृतीच सर्वत्र कौतुकही केलं जातं आहे. सिद्धार्थने त्याची आई सीमा चांदेकर यांचं दुसरं लग्न लावून दिलं आहे. सोशल मीडियावर त्याने त्याची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा चांदेकर यांच्या दुसऱ्या लग्नाची पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने सीमा चांदेकर यांना दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यानंतर आता सिद्धार्थ चांदेकर ‘महाराष्ट्र टाइम्स’सह बोलताना आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलला, यावेळी सिद्धार्थ म्हणाला, “आईनं तिचं आयुष्य आम्हा दोघा भावंडांसाठी खर्ची केलं. पण आता आमचं सर्व मार्गी लागल्यावर तिच्या आयुष्यात एकटेपणा अधिक भासू लागला. तेव्हा तिला एका जोडीदाराची गरज आहे असं आम्हाला जाणवलं. मी आणि माझ्या बहिणीनं तिला कितीही वेळ दिला तरी तो कमीच पडणारा आहे. अशावेळी आम्ही आईची समजूत घातली आणि तिला समजून घेत या निर्णयासाठी तयार केलं”.
यापुढे बोलताना तो म्हणाला, “आमचं संपूर्ण कुटुंब, मुलं तिच्या पाठीशी असलो तरी आम्ही प्रत्येक क्षणी तिच्याबरोबर नसू, त्यासाठी जोडीदारच हवा. जो प्रत्येक क्षणी तिला साथ देईल. हा विचार करून आम्ही आईचं दुसरं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांतच नितीन काकांचं स्थळ सांगून आलं”.
सिद्धार्थच्या या कृतीच सर्वच स्तरातून कौतुक होतं असून अनेक कलाकार मंडळी व प्रेक्षक त्यांच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.