Sayaji Shinde love story : केवळ मराठीचे नव्हेतर तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषेत महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सयाजी शिंदे. त्यांनी आजवर मराठी, हिंदी, साऊथ सिनेविश्वात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा हातभार आहे. मात्र त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी जणांना ठाऊक आहे. सयाजी शिंदे यांनी नेहमीच त्यांच्या कुटुंबाला म्हणजे पत्नीला आणि मुलांना लाइमलाईटपासून दूर ठेवले. बरेचदा ते सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करताना दिसतात. सयाजी शिंदे आणि त्यांची पत्नी अलका सयाजी शिंदे यांची लव्हस्टोरी नेमकी काय आहे हे नुकत्याच समोर आलेल्या मुलाखतीमध्ये समोर आले आहे.
अलका शिंदे यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या आणि सयाजी यांच्या पहिल्या भेटीबाबत सांगितलं. त्या म्हणाल्या, “माझ्या बहिणीचे मिस्टर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि मी तिकडे त्यांना पाहायला गेले होते तेव्हा मला कळलं की, तिथे सयाजी सर आहेत. मी त्यांची फॅन होते, कारण त्यांचं रंगभूमीवरील काम मी पाहिलं होतं. ‘शोभायात्रा’ हे त्यांचं नाटक त्यावेळी जोरदार सुरु होतं; तर मी तिथे त्यांना जाऊन भेटले, त्यांच्याकडून ऑटोग्राफ घेतला”.
आणखी वाचा – अहिल्यादेवींची तब्येत खालावली; आदित्य-पारू मदतीसाठी धावणार, किर्लोस्कर मेन्शनमध्ये एंट्री घेणार आणि…
सयाजी शिंदेंबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल त्या पुढे म्हणाल्या, “त्यावेळी त्यांना जॉन्डिस (कावीळ) झालेला. त्यांनी त्यावेळी मला काय वाचतेस वगैरे विचारलं होतं. मी सांगितलं की अमुक अमुक पुस्तक वाचत आहे वगैरे. तेव्हा मी एमए करत होते. ते म्हणाले, मला पुस्तकं देशील का वाचायला? मी मनात म्हटलं, वाह चांगली गोष्ट आहे, इतका मोठा माणूस आपल्याकडे काहीतरी मागतोय. मग मी दुसऱ्या दिवशी त्यांना पुस्तक नेऊन दिलं. त्यानंतर मी घरी येऊन या सगळ्याबद्दल सांगितलं”.
अलका पुढे म्हणाल्या, “मी त्यानंतर सगळं विसरुन गेले, पण दोन-तीन महिन्यांनी मला त्यांचा फोन आला की, अगं तू हे पुस्तक दिलेलंस, तुला परत हवंय की नको? मग त्यानिमित्ताने आम्ही खरंतर भेटलो आणि मग तेव्हा मैत्री झाली. त्यानंतर २-३ वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो, नंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला”. यानंतर अलका यांना असं विचारण्यात आलं की, “अभिनय क्षेत्रातील कारकीर्द थोडीशी अस्थिर मानली जाते, त्यामुळे जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती”.
आणखी वाचा – नाती, प्रेम, मैत्री आणि…; मनवा-श्लोकचा जगावेगळा प्रवास रंगणार, ‘मना’चे श्लोक’च्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता
यावर म्हणाल्या, “माझी सगळी भावंडं माझ्यापेक्षा मोठी आहेत. माझी आणि सयाजी आमची भेट झाली त्या दरम्यान माझे वडील वारले. तेव्हा माझा मोठा भाऊ होता, ज्याला फक्त एका गोष्टीबद्दल अडचण होती की, आमच्या दोघांमध्ये १५ वर्षांचं अंतर होतं, त्यामुळे त्याने फक्त म्हटलेलं की, तू कसं जुळवून घेशील? कारण असं म्हटलं जातं की इतक्या वयाचं अंतर असून नये, पण आमची त्यासाठी तयारी होती. मग सयाजींना भेटल्यानंतर त्यांनी सहमती दिली, कारण सयाजींनी सगळ्यांना आपलंसं करुन घेतलं”.





