मराठी कलाविश्वातील एक उत्तम अभिनेता, उत्तम कवी व एक उत्तम माणूस म्हणून अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा लोकप्रिय आहे. त्याच्या अभिनयासह, त्याच्या लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे तसेच त्याच्या सूत्रसंचालनाचे अनेक चाहते आहेत. संकर्षण त्याच्या अभिनय, लिखाण व सादरीकरणामुळे जितका ओळखला जातो. तितकाच तो माणूस म्हणूनही उत्तम आहे आणि याचा प्रत्यय त्याच्या कविता, लिखाण किंवा सारीकरणामधून आलेला आहे. अशातच त्याने नुकत्याच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. ज्यामध्ये त्याने कविता, किस्से यांची मैफिल रंगवली. त्याचबरोबर त्यानेत्याच्या आयुष्यातील काही घटनाही शेअर केल्या.
‘वायफळ’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत संकर्षणने त्याच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. यावेळी त्याने वडिलांबद्दलचा एक प्रसंग सांगितला. संकर्षण आजारी असताना त्याचे वडिल त्याला परभणीहून जेवण घेऊन आले होते. हाच प्रसंग सांगत संकर्षण असं म्हणाला की, “एकदा माझं सकाळी ‘आम्ही सारे खवय्ये’चं शूट होतं. त्याच रात्री काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये ८.३० वाजता नाटकाचा प्रयोग होता. त्यादरम्यान मला १०३ ताप होता. ताप जरा जास्तच वाढत गेला. त्यावेळी आम्ही ‘आम्ही सारे खवय्ये’चे चार एपिसोड शूट करणार होतो. पण माझी तब्येत पाहता आम्ही दोनच एपिसोड शूट केले.”
यापुढे तो असं म्हणाला, “शूटसाठी सकाळी घरातून निघताना मी बाबांना फोन केला होता. अंगात खूप ताप आहे बहुदा चित्रीकरण रद्द होऊ शकतं. त्यानंतर मी नाटकाला जाईन. कारण नाटकाचे प्रयोग रद्द करु शकत नाही. त्यातही प्रशांत दामलेंबरोबर नाटक होतं. दोन एपिसोड शूट करणं मला टाळावं लागलं. कारण उभं राहण्याची ताकदच नव्हती. काशिनाथ घाणेकरला जेव्हा माझा प्रयोग सुरु झाला तेव्हा रात्रीचे ८.३० वाजले होते. माझ्या अंगात त्राण नव्हते तरीही पहिला अंक झाला. पहिला अंक झाल्यानंतर मी विंगेत आलो. तेव्हा सकाळी ८.३० वाजता माझ्याशी ५५० मीटर लांब परभणीहून फोनवर बोलत असलेले बाबा घरचा डबा घेऊन विंगेत उभे होते. मी तेव्हा फक्त रडायला लागलो.”
आणखी वाचा – लग्नानंतर नवऱ्यासह कोकणात पोहोचली गौतमी देशपांडे, माशांवर मारला ताव, साध्या लूकने वेधलं लक्ष
यापुढे “त्यांना विचारलं तुम्ही कुठून आलात? त्यांना कळालं की, मला खूपच ताप आहे. आईला गरम गरम चपाती-भाजी करायला लावली. ११ वाजता तपोवन एक्सप्रेसमध्ये बसले. दहा तासांचा प्रवास केला. ठाण्यामध्ये उतरुन काशीनाथ घाणेकरला आले. दिवसभर तापामुळे मला जेवणही जात नव्हतं. पण बाबांनी डबा आणल्यानंतर आईच्या हातच्या चार पोळ्या आणि भाजी पोटभर खाल्ली. त्यानंतर दुसरा अंक खणखणीत केला. मला आजही काशीनाथ घाणेकरच्या विंगेत बाबा हातात दोन पिशव्या घेऊन उभे असलेलं चित्र दिसतं. हे आपल्यासाठी आपल्या आई-वडिलांशिवाय कोणीच करु शकत नाही” असं म्हटलं.