एक उत्तम अभिनेता, एक उत्तम कवी, उत्तम निवेदक, उत्तम दिग्दर्शक व एक उत्तम माणूस म्हणून मराठी मनोरंजन सृष्टीतला चतुरस्त्र कलाकार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणच्या अभिनयासह, त्याच्या लिखाणाचे, दिग्दर्शनाचे आणि त्याच्या कवितांचे अनेक चाहते आहेत. संकर्षण त्याच्या अभिनय, लिखाण व सादरीकरणामुळे जितका ओळखला जातो. तितकाच तो त्याच्या कवितांसाठीही ओळखला जातो. संकर्षणच्या अनेक कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्री स्पृहा जोशीबरोबर तो कवितांचे कार्यक्रम करत असतो. त्यांचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रसिद्ध झाला आहे. हा कार्यक्रम त्यांच्या अनोख्या शैलीतील कवितांसाठी प्रसिद्ध आहे.
या कार्यक्रमाचे आजवर महाराष्ट्र आणि इतर देशांत हाऊसफुल्ल प्रयोग सादर झाले आहेत. प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाचं वेळोवेळी कौतुक झालं आहे. अशातच आता या कार्यक्रमानिमित्त संकर्षण व स्पृहा परदेशात जाणार आहेत. अमेरिकेला त्यांच्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार असून याबद्दल संकर्षणने त्याच्या सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर केली आहे. संकर्षण हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याच्या कामाबद्दलची माहिती शेअर करत असतो. अशातच त्याने त्याच्या आगामी ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ कार्यक्रमाची माहिती दिली आहे.
संकर्षणने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “भारताची, मुंबईची, घरची, घरातल्यांची आणि तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत राहील. दौरा कित्तीही छान असला तरी लांब जातांना त्रास होतो. हो ना??? येतो लवकर. शुभेच्छा पोटभर द्या हा” या पोस्टसह त्याने त्याच्या अमेरिकेतील आगामी कार्यक्रमाबद्दलचीदेखील माहिती दिली आहे. संकर्षणने त्याचे विमानतळावरील खास पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, अभिनेता संकर्षण हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संप्रकात राहत असतो. सध्या रंगभूमीवर संकर्षणचे ‘संकर्षण व्हाया स्पृहा’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘नियम व अटी लागू’ असे तीन नाटकं चालू आहेत आणि या तिन्ही नाटकांना प्रेक्षकांकडूनदेखील हाऊसफूल प्रतिसाद मिळत आहे. तसेच तो सध्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’चे परीक्षणही करत आहे.