आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. संताचा पालखी सोहळा आणि पायी जाणारे वारकरी ही परंपरा जाणून महाराष्ट्रातील एक आकर्षणच आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी मंडळी हळूहळू विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. पायी वारी करण्याचा अनुभव हा अदभूतच असतो. ज्ञानोबा, तुकोबांसह अनेक संतांच्या पालख्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत असतात. असंख्य वारकरी तन्मयतेने, पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी जातात. हा नयनरम्य सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. जीवन समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे भूषण आहे.
याच वारीचा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी सामान्य वारकऱ्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही या वारीत सहभाग् घेत असतात. असाच वारीत सहभागी होणारा मराठी कलाकार म्हणजे अभिनेता संदीप पाठक. संदीप पाठक गेली अनेक वर्षे या वारी सोहळ्यात सहभागी होत आहे. मराठी चित्रपट, नाटक व मालिका अशा सर्व माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेला अभिनेता संदीप पाठक यंदाच्या वारीतही सहभागी झाला आहे. या वारी सोहळ्यातील काही खास क्षण त्याने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
आणखी वाचा – “मला शहाणपणा शिकवू नका”, AI च्या वापराबद्दल सुबोध भावेचं रोखठोक मत, म्हणाला, “कलाकारांच्या पोटावर पाय…”
संदीपने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे वारीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेता वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधत, त्यांच्याबरोबर गप्पा मारत चालताना दिसत आहे. तसेच वाटेत भेटण्याऱ्या लहानग्यांशीही तो खास संवाद साधत आहे. वारीतील अनेक वारकरीही संदीपबरोबर येऊन खास संवाद साधत आहेत. त्याला मिठी मारत त्याच्याशी गप्पा मारत आहेत. पायी चालते मी पंढरी गं, वारीचे रंग विठोबा संग” असं म्हणत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – जावईबापूंचा मानपान, सासू-सासऱ्यांची खास तयारी अन्…; सासरवाडीत प्रथमेश परबचे लाड, पत्नीने शेअर केले खास फोटो
दरम्यान, संदीपने शेअर केलेल्या या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. लाईक्स व कमेंट्स करत अभिनेत्याच्या या कृतीबद्दल त्याचे कौतुक केलं आहे. “राम कृष्ण हरी”, “माऊली माऊली”, “जय हरी विठ्ठल” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.