महाराष्ट्राला वारीची मोठी वैभवशाली परंपरा लाभली आहे. आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना मनाला ओढ लागते ती पंढरीच्या विठुरायाचं सावळे रूप पाहण्याची, त्याला भेटण्याची, त्याचं दर्शन घेण्याची. पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. विठ्ठलाचं सावळं रूप पाहण्यासाठी भक्त आतुर असतात. चातकाप्रमाणे ते वारीची वाट पाहत असतात. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी मंडळी हळूहळू विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. हा नयनरम्य सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. जीवन समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे भूषण आहे.
वारीचा हा नेत्रदीपक सोहळा अनुभव अनुभवण्यासाठी अनेक वारकरी पालखीत सहभागी होत असतात. सामान्य वारकऱ्यांबरोबरच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही या वारीत सहभाग घेत असतात. असाच वारीत सहभागी होणारा मराठी कलाकार म्हणजे अभिनेता संदीप पाठक. संदीप पाठक गेली अनेक वर्षे या वारी सोहळ्यात सहभाग घेतो. मराठी चित्रपट, नाटक व मालिका अशा सर्व माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता संदीप पाठक यंदाच्या वारीतही सहभागी झाला. या वारी सोहळ्यातील काही खास क्षण त्याने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
अशातच संदीपने त्याच्या वारीचा अनुभव शेअर केला आहे. संदीप पाठकने नुकतीच देवयानी पवार यांच्या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये संदीप यांना त्यांच्या वारीच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले. यावेळी “वारी म्हणजे काय?” असा प्रश्न संदीपला विचारण्यात आला. याचे उत्तर देत संदीपने असं म्हटलं की, “सोप्या भाषेत सांगायचं झालं भारतात अनेक राज्य आहेत. प्रत्येक राज्याची ओळख आहे. त्यापैकी महाराष्ट्र, महाराष्ट्राची संस्कृती व महराष्ट्राचे संस्कार म्हणजे वारी. एकतेचा व मानवतेचा संदेश देणारी काहीशे वर्षांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे”.
यापुढे तो असं म्हणाला की, “एक महिना असा येतो की जिथे ना धर्म, ना जात, ना रंग, ना भाषा, गरीबी, श्रीमंती, उच्च, नीच काहीही पाहिलं जात नाही. सगळे एका ध्येयासाठी, केवळ पांडुरंगासाठी, काळ्या मातीतली माणसं काळ्या विठ्ठलासाठी अविरतपणे चालत राहतात. उद्देश काही नाही. स्वार्थ काही नाही. निस्वार्थपणे चालत राहतात. ती परंपरा, ती संस्कृती, ते संस्कार म्हणजे वारी आहे”.