Riteish Deshmukh Emotional : ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ या सोहळ्यामधील अनेक व्हिडीओ समोर आले असून यंदाच्या या पुरस्कार सोहळ्याच्या विजेतेपदावर कोण कोण असणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, चित्रपट यांवर कोण नाव कोरणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, यंदाच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख आणि अमेय वाघ सांभाळताना दिसणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यातील अनेक व्हिडीओ समोर आले आहेत यामधील एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये रितेश देशमुख मंचावर भावुक झालेला दिसत आहे.
मंचावर जितेंद्र जोशी आणि रितेश देशमुख पाहायला मिळत आहेत. ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ सोहळ्यात जितेंद्र जोशी एका अशा व्यक्तीचं पत्र रितेशला वाचून दाखवतो ज्याने तो भावुक होतो. आणि हे पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी येतं. ही खास व्यक्ती म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख. जितेंद्र जोशीने विलासरावांचं पत्र वाचताच रितेश देशमुखला अश्रू अनावर झालेले व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – शिवशाहीत ‘ती’ फसली, अत्याचार सहन करुनही दोष तिलाच का?
समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये जितेंद्र जोशी विलासराव देशमुखांचं पत्र वाचून दाखवत म्हणाला, “सप्रेम नमस्कार विनंती विशेष, पत्रास कारण की या पत्रास काहीही कारण नाही. बापाला मुलाशी बोलायला कधीपासून कारणांची गरज भासायला लागली. आमचा दांडगा जनसंपर्क तुम्हाला माहीतच आहे. त्यांच्याबरोबर तुमचा पहिला मराठी चित्रपट पाहताना खूप भरुन आलं. तुमचा ‘माऊली’ पाहताना तर अभिमान वाटत होता. तुमचं दिग्दर्शक म्हणून पहिलं ‘वेड’ अनुभवलं अन् खात्री पटली यापुढे अशीच आनंदी अनुभूती आम्हाला आणि प्रेक्षकांना देत राहाल”.
आणखी वाचा – Oscar 2025 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचा बोलबाला, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
पुढे पत्रवाचन सुरु ठेवत तो म्हणाला, “‘तुझे मेरी कसम’चा आमचा समज तुम्ही ‘वेड’मध्ये खोटा ठरवाल असं वाटलं होतं, पण नाही. सूनबाई तुम्हाला अजूनही पुरुन उरत आहेत. गंमत बाजूला. पण, रितेश तुम्ही वयानं आणि कर्तुत्वानं कितीही मोठे झालात तरीही आम्हाला दिसतो, तो भावंडांबरोबर बाबळगावच्या विहिरीमध्ये पोहणारा, गुडघे फोडून सायकलची फेरी मारणारा, मातीत ढोपर सोलवटून गोट्यांचे डाव जिंकणारा, क्रिकेटची बॅट खांद्यावर घेतलेला आमचा लहानगा चिमुरडा. पण, आता तुम्ही अवघ्या भारताचं दैवत, आमची प्रेरणा राजाधिराज छत्रपती शिवरायांवर चित्रपट घेऊन येत आहात. परवाच्या तुमच्या लूक टेस्टला मी डोळे भरुन पाहिलं आणि डोळे भरुन आले”, जितेंद्र जोशीने वाचलेलं वडिलांचं पत्र ऐकून रितेशचे डोळे पाणावले आणि तो भावुक झाला. ८ मार्चला रात्री ७ वाजता ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’मध्ये हा क्षण पाहायला मिळणार आहे.