Maitricha Saatbara Interview : ‘आठवी अ’, ‘पाऊस’, ‘दहावी अ’ वेबसीरिजच्या भरघोस यशानंतर आणखी एका वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु झाली. ती वेबसीरिज म्हणजे ‘मैत्रीचा ७/१२’. या वेबसीरिजचं पोस्टर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये याबाबत उस्तुकता होती. अखेरीस ‘मैत्रीचा ७/१२’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोशल मीडियाद्वारे तर ‘मैत्रीचा ७/१२’ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचनिमित्त या सीरिजच्या कलाकारांशी आपण गप्पा मारणार आहोत. या सीरिजमध्ये सिद्धार्थ हे पात्र साकारणारा अजय इंगवले याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करुया आजच्या गप्पा…
अभिनय क्षेत्रात तू कधीपासून कार्यरत आहेस?, आणि मैत्रीचा ‘७/१२’साठी तुझी निवड कशी झाली?
कॉलेजमध्ये असताना मित्रांबरोबर म्हणून ऑडिशनला गेलो. एक प्रयत्न करुन पाहायला काय हरकत आहे असं म्हणत मी ऑडिशन दिली. आणि तिथून मला अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर मी रीतसर अभिनय शिकण्यास प्रवेश घेतला आणि चार-पाच वर्ष नाट्यक्षेत्रात काम केलं. नाटकांमध्ये रमत गेलो. मी अकाउंटची नोकरी सांभाळत माझी अभिनयाची आवडही जपली. मात्र अभिनयामुळे नीट नोकरीकडे लक्ष लागत नव्हतं यादरम्यान मी दोन-तीन नोकऱ्याही सोडल्या. आर्थिक गणित जुळून यावीत म्हणून मी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून बरंच काम केलं. यादरम्यान मला ‘इट्स मज्जा’कडून ऑडिशन देण्याची संधी आली आणि माझी या वेबसीरिजसाठी निवड झाली. पहिल्यांदा मी ऑडिशन दिलं ते या सीरिजमधील आदित्य या पात्रासाठी दिलं. हे पात्र मला फार आवडलं. सरांनीही माझं खूप कौतुक केलं. त्यानंतर मला थोड्या वेळाने सिद्धार्थ या पात्रासाठी ऑडिशन देशील का विचारलं आणि मी त्या पात्राचीही ऑडिशन दिली. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा सेकंड रोलसाठी मला बोलावण्यात आलं. आणि त्यांनतर फोन करुन त्यांनी माझं सिलेक्शन झालं असल्याचं सांगितलं. एकूणच ही माझी ‘मैत्रीचा सातबारा’साठी ही प्रोसेस होते.
सिद्धार्थ या पात्रासाठी एक कलाकार म्हणून तू किती मेहनत घेतली आहेस?
सुरुवातीला वर्कशॉपमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आणि शिकवल्या गेल्या. हे पात्र नेमकं कसं असेल, त्याचा स्वभाव शांत असेल याबाबत माहिती देण्यात आली होती. आणि पाहायला गेलं तर हे पात्र कुठेतरी माझ्या खऱ्या आयुष्याशी मिळतंजुळतं होतं. डॉक्टर असल्याने साफसफाई, नीटनेटकेपणा या सगळ्या गोष्टी कशा संभाळाव्यात याबाबत दिग्दर्शकाकडून सांगण्यात आलंच होतं. डॉक्टर हे पात्र साकारायचे होतं म्हणून या क्षेत्राशी निगडित मी थोडा आढावा घेतला. त्यांचं राहणीमान, त्यांचे जीवन यासाठी काही व्हिडीओ पाहिले.
या भूमिकेमुळे अजयमध्ये काही बदल झाले आहेत?, आणि एक कलाकार म्हणून काही बदल झाले आहेत का ?
बदल हा फक्त भूमिकेमुळे झाला आहे असं नाही आहे. माझ्यात झालेला जो काही बदल असेल तो सहकलाकारांमुळे, दिग्दर्शकामुळे आणि आजूबाजूला असणाऱ्या वातावरणामुळे झाला आहे. प्रत्येकाकडून मला काही ना काही शिकायला मिळालं आहे. हे माझं पहिलं काम असल्याने अर्थात धाकधूक ही होतीच, पण सहकलाकारांबरोबर असताना आत्मविश्वास, एखाद्या सीनदरम्यान आपल्याला काही सुचत नसताना त्यांनी सांभाळून घेतलेली बाजू हे सगळं काही शिकायला मिळालं. माझ्याकडून ज्या ज्या चुका झाल्या आहेत त्यांचा आजही अभ्यास हा सुरुच आहे.
तुम्ही सेटवर इतके दिवस एकत्र होता यादरम्यान काही गमती-जमती वा तुझ्या आठवणीतील एखादा किस्सा तुला सांगायला आवडेल का?
असे किस्से अनेक आहेत. एकदा सीनदरम्यान पकडापकडी सुरु होती. पण माझं पात्र असं असल्याने मी कोणाला मारू शकत नाही. आदित्य उड्या मारू शकतो, धडपडू शकतो, दौलत त्याच्या पात्राप्रमाणे कोणालाही मारू शकतो, पण माझं पात्र वेगळं असल्याने मी त्यांच्यासारखा बिनधास्त वागू शकत नाही. समंजसपणा माझ्या पात्रात असल्याने मी त्यांना समजावयाला जात होतो तेव्हा त्यांच्या या वादात मी अडकलो आणि चुकून माझ्याच कानाखाली मारण्यात आली. आणि कॅमेरा रोलिंग असल्याने आणि पात्राची आखून दिलेली रेषा पाहून मी काहीच करु शकलो नाही त्यामुळे हा किस्सा माझ्या चांगलाच लक्षात आहे.
ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर कुटुंब, मित्रपरिवार, सोशल मीडियामधून कशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत?
वेबसीरिज प्रदर्शनाआधी जेव्हा पोस्टर प्रदर्शित झालं तेव्हापासून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. वैयक्तिक मॅसेज करत, कमेंटद्वारे पात्राचं कौतुक करत आहेत. ‘इट्स मज्जा’चं काम यापूर्वी सर्वांनी पाहिलं आहे. ‘आठवी – अ’, ‘दहावी- अ’ या वेबसीरिज चांगल्याच लोकप्रिय आहेत. आणि यानंतर त्यांच्या ‘मैत्रीचा सातबारा’ सीरिजमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे सगळे हेच म्हणत आहेत की, तुझं हे पदार्पण खूप खास आहे. नातेवाईकांकडूनही कौतुक होतं आहे. घरातल्यांनी यापूर्वीच माझं काम पाहिलंच आहे आणि आता स्क्रीनवर पाहताना त्यांचाही आनंद गगनात मावत नाही आहे, ते नातेवाईकांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांना वेबसीरिज पाहण्यास सांगत आहेत. टीव्हीवर मुलाची सीरिज आली आहे याचा त्यांना खूप आनंद झाला आहे.
‘मैत्रीचा सातबारा’ ही वेबसीरिज प्रेक्षकांनी का पाहावी?, आणि पुढे कथानकांमध्ये प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे?
सगळ्यांनाच माहित आहे की मैत्रीचं हे नातं किती स्पेशल आहे. मैत्रीतील हेवेदावे सोडवून आपण कसे एकत्र येऊ शकतो आणि एकत्र येतो हे या सीरिजमध्ये पाहायला मिळत आहे. मनमोकळेपणाने मित्रांसमोर व्यक्त होणं हे ‘मैत्रीचा सातबारा’मध्ये पाहायला मिळणार आहे, एकमेकांबद्दलचं प्रेम, भांडण, हेवेदावे हे सारं काही या सीरिजमध्ये पाहता येणार आहे.