आजवर मराठी सिनेसृष्टीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करत अभिनेते प्रवीण तरडे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. इतकंच नव्हे तर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी त्यांच्या कलेच्या जोरावर छाप पाडली आहे. आजवर नाटक, मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमांमधुन त्यांनी अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. अभिनयाबरोबरच त्यांनी दिग्दर्शनातूनही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘मुळशी पॅटर्न’, ‘देऊळ बंद’, ‘धर्मवीर’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी उत्तमरीत्या पेलवली. (Pravin Tarde New Movie)
सोशल मीडियावरही प्रवीण तरडे बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून ते साऊथ सिनेविश्वात पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता अखेर या चर्चांना प्रवीण यांनी पूर्णविराम दिला आहे. मराठी व हिंदी सिनेसृष्टीनंतर आता प्रवीण हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यास सज्ज झाले आहेत. आगामी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचे नाव व भूमिका जाहीर करत त्यांनी याबाबतची माहिती शेअर केली आहे.
चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्यांनी “दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ‘मुख्य खलनायक’ म्हणून माझा प्रवेश. ‘अहो विक्रमार्का’मध्ये ‘असुरा’ बनून येतोय तुमच्या भेटीला. मराठीबरोबर भारतातल्या सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अख्ख्या भारतभर मार्केट आता आपलं आहे”, असं खतरनाक कॅप्शन देत त्यांनी त्यांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रवीण तरडे या चित्रपटात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता देव गिल ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे यांच्यासह तेजस्विनी पंडित, सयाजी शिंदे, चित्रा शुक्ला अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी असणार आहे. ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटातील प्रवीण यांचा पहिला लूक शेअर केल्यावर त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. चाहतेमंडळीही या त्यांच्या भूमिकेला पसंती दर्शविताना दिसत आहेत.