मराठी नाटक घराघरात पोहचवलेले आणि मराठी रंगभूमी जगलेले प्रसिद्ध अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. नाटक म्हटलं की प्रशांत दामले यांचं नाव आवर्जून येतं. आजवर चित्रपट व नाटक विश्वात प्रशांत दामले यांनी छाप पाडत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. जवळपास गेली तीन दशके मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ ‘नाटकवाला’ म्हणून त्यांनी स्वतःची अशी खास मिळवली. १२५००च्या विक्रमी प्रयोगाआधीही प्रशांत दामले यांनी केलेल्या विक्रमाची थेट लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली आहे. (Prashant Damle Funny Reply)
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘सारखं काहीतरी होतंय’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘साखर खाल्लेला माणूस’, यांसारखी त्यांची अनेक नाटक रंगभूमीवर गाजली. आजही त्यांच्या नाटकांच्या प्रयोगाला हाऊसफुल्ल बोर्ड दिसला नाही असं क्वचितच झालं असावं. नाटकविश्वाकडे विशेष लक्ष केंद्रित करत आता प्रशांत दामले यांनीं नाटकांची निमिर्ती सुरु केली. इतकंच नव्हेतर त्यांनी नाटकांची तिकीट बुक करण्यासाठी तिकिटालय हे ऍप सुरु केलं.
प्रशांत दामले नाटकविश्वात जितके सक्रिय आहेत त्याहून अधिक ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियावरुन नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. विशेषतः ते त्यांच्या नाटकांचे अपडेट सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर करतात. कित्येकदा ते वेळात वेळ काढून चाहत्यांनी कमेंटमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देतात. अशातच प्रशांत यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांचे अपडेट दिले आहेत. शिवाय या नाटकांसाठीचे बुकिंग तिकिटालय ऍपवरून करता येईल याबाबतही सांगितले आहे.
प्रशांत दामले यांनी फेसबुकवर ही पोस्ट शेअर करत एका युजरने गमतीत कमेंट केली आहे की, “प्रशांत दामले सर, गंमत म्हणून विचारत आहे. अर्ध्या तिकिटात प्रवेश मिळेल का हो?”, असा प्रश्न विचारला आहे. नेटकऱ्याच्या या प्रश्नाला प्रशांत दामले यांनी मजेशीर उत्तर देत असं म्हटलं की, “नाटक पण अर्धच बघता येईल”. अशी कमेंट करत त्यांनी हसायचे इमोजी जोडले आहेत.