मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेता प्रसाद ओक व अभिनेत्री मंजिरी ओक ही लोकप्रिय जोडी आहे. सोशल मीडियावर ही जोडी बर्यापैकी सक्रिय असलेली पाहायला मिळते. आज आनंदात दिसणाऱ्या या जोडीने मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. अनेक समस्यांचा सामना करत त्यांनी मोठं यश मिळवलं आहे. प्रसाद हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता व दिग्दर्शक आहे. तर मंजिरीनेदेखील काही वर्षांपूर्वीच निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आहे. दोघांनीही शून्यातून आपल्या संसाराची सुरुवात केली आहे. (Prasad Oak On Manjiri Oak)
प्रसादच्या यशात मंजिरीचा मोलाचा वाटा आहे. एक पत्नी म्हणून कायम ती आपल्या नवऱ्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे. मंजिरी सिनेविश्वात सक्रिय असली तरी उत्तम गृहिणी म्हणून ती आजही काम पाहते. गृहिणी होण्याआधी दोन वर्ष मंजिरीने नोकरीही केली. याबाबत स्वतः प्रसादने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. नुकतीच प्रसादने ‘आरपार’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना प्रसादने कठीण काळात बायकोची त्याला मिळालेली साथ याबाबत भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना प्रसाद असे म्हणाला की, “राजाभाऊ गेले आणि धुवाधार सुरु असलेलं नाटक ठपकन बंद पडलं. आणि ते बंद पडलं त्याच्यानंतर जवळपास वर्ष – सव्वा वर्ष माझ्याकडे काहीच काम नव्हतं. एकही मालिका नाही, एकही नाटक नाही. चित्रपट तर माझ्या स्वप्नांत सुद्धा नव्हते. त्यावेळी मंजूने एका मॅगझीनमध्ये नोकरी केली. त्यावेळी तिचा मुंबईचा प्रवास सुरु झाला. तेव्हा मी तिला एशियाडने पुण्याहून दादरला आणलं”.
पुढे तो मंजिरीच्या या प्रवासाबाबत बोलताना म्हणाला, “त्यावेळी लोकलने मी तिला बोरिवलीला नेलं. त्या लोकल मधून उतरल्यानंतर तिने मला विचारलं ही ट्रेन पुण्याला जाते का?. असा जिचा प्रवास सुरु झाला आहे ती कांदिवली ते कोपर खैराणे असा प्रवास तिने दोन ते तीन ट्रेन बदलत गरोदरपणात केला. असे दिवस आम्ही काढले. आणि असे दिवस काढले म्हणून आजचा दिवस आम्ही बघत आहोत”.