सध्या चित्रपटगृहांमध्ये किंग खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. प्रेक्षक, चाहते ‘जवान’ चित्रपटाचं व किंग खानचं भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. अशातच कलाकार मंडळींनाही जवानची भुरळ पडली आहे. मराठमोळा अभिनेता किरण माने याला ‘जवान’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. तब्बल चार वर्षांनी यंदा शाहरुख खानने ‘पठाण’ व ‘जवान’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. आणि त्याच्या या दोन्ही चित्रपटांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. (Kiran Mane On Shahrukh Khan Jawan)
याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेते किरण माने यांनी किंग खानसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. किरण माने यांनी शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट पहिला असून त्याचं कथानक, सध्याची समाजिक परिस्थिती याबाबत खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी शाहरुख आणि त्याच्या ‘जवान’चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे.
फेसबुक पोस्ट शेअर करत किरण माने यांनी लिहिलं आहे की, “‘जवान’ने सगळ्या भारतीयांच्या मनोरंजनासोबतच, मनात खदखदत असणार्या गोष्टींना वाचा फोडली आहे. या चित्रपटाने खर्या समस्या सोडवून ‘न्याय’ पण मिळवून दिला आहे. सिनेमात का होईना ‘काला धन’ परत मिळवून गोरगरीबांच्या खात्यात जमा करण्यापासून लोकप्रतिनिधी, मंत्र्यासंत्र्यांना गुडघ्यावर आणून अत्यावश्यक सेवांबद्दल जाब विचारण्यापर्यंत सगळं या चित्रपटाने केलं.”
“पूर्वीच्या काळी अशा आशयाचे अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. पण आज हे मांडणं अत्यंत धाडसाचं आणि गरजेचं आहे. त्याकाळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुल्यांची जपणूक होती. ‘बायकॉट ट्रेंड’ नव्हता. त्यामुळं आज ‘खर्याखुर्या’ विषयावर परखडपणे बोलून वास्तवाचं भान देणार्या मनोरंजक फॅंटसीची गरज होती. प्रेक्षकांनी अक्षरश: दिवाळी-दसरा असल्यागत ही गोष्ट साजरी केली. मनोरंजन करण्याबरोबर समाजभान असणारे कलावंत आज दुर्मिळ झाले आहेत. व्यवस्थेपुढं लोटांगण घालणार्या पायचाटू, लाळघोट्या सुमार कलावंतांची सद्दी आहे. या काळात पाठीचा कणा ताठ ठेवत, डोळ्यांत अंगार घेवून, फूल्ल ऑफ स्वॅगनं शाहरूख आला आहे.”
“खूप दिवसांनी थिएटरमध्ये हिरोच्या एन्ट्रीला टाळ्या, शिट्ट्यांचा छप्परतोड दनका अनुभवला. खूप दिवसांनी “बेटे को हाथ लगाने से पहले…” सारख्या डायलॉगला प्रेक्षकांनी जल्लोष केलेला पाहिला. खूप दिवसांनी आमचा खराखुरा ‘हिरो’ आम्हाला दिसला. ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ घेऊन थिएटरबाहेर पडलो. बाहेर पडताना लोकांना घरी जायची घाई नव्हती. मन भरलं नव्हतं. जाता-जाता शाहरूखच्या पोस्टर समोर सेल्फी काढायला रांग लागली होती. मी देखील त्यात सामील झालो. कारण आम्हा सर्वांना तीन तासात ‘पोएटिक जस्टीस’ मिळाला होता.”