बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नक्कीच तिच्या काळातील सर्वात फिट दिसणार्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आजवर शिल्पाने स्वत:ला सांभाळून ठेवले आहे. फिटनेसच्या बाबतीत ती सदैव तत्पर असते. सोशल मीडियावरूनही ती कायम चाहत्यांसह फिटनेसचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. बरं, याशिवाय ही अभिनेत्री तिच्या अभिनय कौशल्यासाठी देखील ओळखली जाते. तिने तिच्या अभिनयाची जादू ‘धडकन’, ‘बाजीगर’ आणि इतर अनेक चित्रपटांमधूनही दाखवली. नुकत्याच तिने सिद्धार्थ काननशी साधलेल्या संवादात मोठा खुलासा केला आहे. कोणत्याही मोठ्या बॅनरने तिला चित्रपटाची ऑफर दिली नाही, याबाबत शिल्पाने मुलाखतीदरम्यान भाष्य केलं. (Shilpa Shetty Revels Truth)
याबाबत बोलताना शिल्पा म्हणाली, “मोठ्या बॅनरचे चित्रपट मला का नाही मिळत? याबद्दल मला कायम आश्चर्य वाटायचं. आज मी जे काही मिळवलंय, ते मोठ्या कलाकारांसह छोट्या चित्रपटांमध्ये काम करून मिळवलं आहे. अनेक चित्रपटांमध्ये मी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या, माझे चित्रपट चालले नाहीत पण, माझी सगळी गाणी हिट झाली. बॉलीवूडमध्ये फक्त मी माझ्या गाण्यांमुळे टिकून आहे.” शिल्पाच्या गाजलेल्या आयटम सॉंगबद्दल बोलायचं झाल्यास ‘आये हू यूपी, बिहार लुटणे’ या गाण्याचा समावेश आहे.
शिल्पा पुढे म्हणाली,”मला कधीच अभिनेत्री असा टॅग मिळाला नाही. बॉलीवूडमध्ये मला फक्त ग्लॅमरस भूमिकांसाठी विचारणा केली जायची. ‘मैं खिलाडी तू अनाडी’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यावर माझं नाव आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर घेतलं जायचं. परंतु, मला कधीच स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही.”
जुने दिवस आठवून तिने असेही सांगितले की, ” बरेचदा असंही झालं की माझ्या कामाचा मोबदला मला निर्मात्यांनी दिलाच नाही. ९० च्या दशकातील काही चित्रपट आहेत ज्यात मी काम केले आहे पण ज्यावेळी मोबदला देण्याची वेळ यायची तेव्हा निर्माते म्हणायचे, ‘अरे, आमचे नुकसान झाले आहे.’ असं बोलून कित्येकांनी त्या काली उर्वरित रक्कम दिलेली नाही. तो काळ खूप वेगळा होता,”
शिल्पा शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास लवकरच ती ‘सुखी’मध्ये दिसणार आहे. सुखी चित्रटाचा ट्रेलर आधीच रिलीज झाला असून २२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहणं रंजक ठरेल. याशिवाय शिल्पा शेट्टी लवकरच रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सिरीजसह सिद्धार्थ मल्होत्रा सह-अभिनेता असलेल्या ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे.