आई! प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती. ‘आई’ या दोन अक्षरी या शब्दात सारे विश्व व्यापते. मात्र आई सोडून गेल्यावर सारे विश्व नको नको वाटतं. प्रत्येक मुलासाठी आईचं महत्त्व हे अधिकच असतंच. पण आई सोडून गेल्यावर प्रत्येक मुलगा आपल्या आईला बहीण, बायको किंवा मुलीच्या रुपात पाहत असतो. असंच आपल्या आईला मुलीच्या रुपात बघणारा अभिनेता म्हणजे कैलाश वाघमारे. आईच्या निधनानंतर कैलाशने त्याच्या मुलीमध्ये आईला पहिल्याचे म्हटलं आहे. नुकतीच त्याने ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. यामध्ये त्याने त्याच्या आईबद्दल भाष्य केलं.
‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकामुळे कैलाश प्रेक्षकांच्या भेटीला आला. या नाटकाने एक वेगळा विषय रंगभूमीवर मांडला, ज्याचे अनेक यशस्वी प्रयोगही झाले. त्यानंतर कैलाश अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. यावेळी कैलाशने ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ मुलाखतीत आपल्या आईविषयी भाष्य केलं आहे. यावेळी अभिनेता आईच्या आठवणीत भावुक झाला.
आईबद्दल बोलताना कैलाशने असं म्हटलं की, “कोविडचा काळ माझ्यासाठी खूपच चांगला होता. पण तेव्हा माझी आईही आजारी होती. ती अगदी शेवटच्या क्षणाला आली होती. त्यामुळे तेव्हा मी प्रचंड द्विधा मनस्थितीत होतो. माझ्या आईबरोबर माझं वेगळंच नातं होतं. ती आजारी होती. तेव्हा मी खूप त्रासात होतो. माझ्यासाठी लॉकडाऊनचा तो काळ वेगळाच होता. तो त्रास मला जाणवलाच नाही. तेव्हा आम्ही गावी होतो. गावाकडे सगळे लोक खेळीमेळीने राहत होतो”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “माझी मुलगी अगदीच माझ्या आईसारखी दिसते. तिचे कान, डोळे, गाल आणि तिच्या हाताची बोटं सगळं माझ्या आईसारखच आहे. माझ्या आयुष्यात काही घडलं तर मी ते सगळं माझ्या आईला सांगायचो. आज ते मी माझ्या बायकोबरोबर शेअर करतो, पण आईला सांगण्यात ज्या भावना होत्या त्या मला आता अनुभवता येत नाहीत. माझ्या आईला मी काही सांगितल्यानंतर ती “अरे वा, किती छान, किती मस्त” असं म्हणायची. ते मी आता खूप मिस करतो. माझ्या मुलीला माझ्या प्रत्येक कामाबद्दल जसा आनंद असतो तसंच माझ्या आईला माझा अभिमान होता”.