अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता या तिन्ही भूमिका उत्तमरित्या पेलणारा लोकप्रिय कलाकार म्हणजे हेमंत ढोमे. हेमंतने आजवर अनेक लोकप्रिय चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘झिम्मा’ नंतर ‘झिम्मा २’ यांसारखे दर्जेदार चित्रपट हेमंतने दिले आहेत. हेमंतच्या २०२१ मध्ये आलेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाने सर्वांचे भरभरून मनोरंजन केलं. यानंतर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा-२’ला देखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. ‘झिम्मा’ व ‘झिम्मा-२’च्या अभूतपूर्व यशानंतर आता अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे, नुकतीच त्याने त्याच्या नव्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. (Hemant Dhome New Movie)
हेमंतच्या नव्या आगामी चित्रपटाचं नाव ‘फसक्लास दाभाडे’ असं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी पाहायला मिळेल असं पोस्टवर नमूद करण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि अभिनेत्री-निर्माती क्षिती जोग हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये क्षिती, सिद्धार्थ व अमेय ट्रॅक्टरवर बसून खळखळून हसत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता यांच्या इरसाल स्टोरीत नेमकं काय पाहायला मिळणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या नवीन चित्रपटासंदर्भात हेमंतने बुधवारी एक फोटो शेअर केला होता. ज्यातून त्याने या चित्रपटाचे शूटिंग त्याच्या गावात केली असल्याचे सांगितले होते. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं होतं की, “हा फोटो मी माझ्या गावाकडे गेल्यानंतर माझ्या माणसांनी केलेल्या सत्काराचा आहे. त्या सगळ्यांचा माझ्यावर खूप जीव आहे आणि माझाही त्यांच्यावर आहे. प्रचंड प्रेम, आपुलकी आणि खूप जास्त आदर हा मला माझ्या गावाविषयी लहानपणापासूनच होता म्हणजे सगळ्यांनाच असतो. पण मला जरा जास्तच आहे. मला कायम वाटायचं माझं गाव आणि आजूबाजूचा परीसर खूप सुंदर आहे!”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “लहानपणी कुठे माहित होतं आपण मोठे झाल्यावर दिग्दर्शक होऊ, निर्माता होऊ? पण आता माझा सातवा चित्रपट लिहिताना, दिग्दर्शित करताना आणि माझी आणि क्षितीची म्हणजे ‘चलचित्र मंडळी’ची चौथी निर्मिती असताना मी व क्षितीने मनाशी ठरवलं होतं हा चित्रपट आपल्या गावीच बनवायचा. आपल्या भागातले लोक घेऊन आपल्या भागातच चित्रीत करायचा. गंमत बघा माझ्या लाडक्या टिमबरोबर आम्हाला आपला हा चित्रपट स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत शुट करता आला. या चित्रपटाचा विषय माझ्या अत्यंत जवळचा विषय आहे. मी जे जगलो, जे पाहिलं अनुभवलं ते सगळं मांडायचा प्रयत्न केलाय… हळू हळू पुढच्या कथांमधूनसुद्धा मांडत राहिनच”.
आणखी वाचा – इतकी सुंदर व गोंडस दिसते सई लोकुरची लेक, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, म्हणाली, “आई म्हणून माझा…”
दरम्यान, हेमंतच्या या नवीन चित्रपटानिमित्त त्याच्यावर मराठी मनोरंजन विश्वातून अनेकांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. चित्रपटाबद्दल बोलायचे झालं तर या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमेने केलं आहे. तर, निर्मितीची जबाबदारी क्षिती जोग व आनंद एल राय यांनी सांभाळली आहे. त्यामुळे आता हा नवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.