बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. या चित्रपटातून विकी कौशल कधीही न पाहिलेल्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लक्ष्मण उतेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘छावा’ या चित्रपटामध्ये विकी कौशल हा हरहुन्नरी अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटातील त्याची वेशभूषा समोर आली होती. तेव्हापासून सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली होती. त्यानंतर आलेल्या टीझरने ही उत्सुकता आणखीन वाढवली. (Ashok Shinde On Chhaava Movie Role Rejection)
छावा हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात आशुतोष राणा सरसेनापती हंबीरराव मोहिते, दिव्या दत्ता ही सोयराबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका मंदाना ही येसूबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय, अभिनेता संतोष जुवेकरही या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अभिनेते अशोक शिंदेही असणार होते. मात्र त्यांनी भूमिकेमुळे चित्रपट नाकारला दिला असल्याचे सांगितलं आहे. ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या कार्यक्रमात त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – अरबाज-निक्कीनंतर छोटा पुढारी जान्हवी किल्लेकरच्या भेटीला, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “दाजींनी मला…”
यावेळी अशोक शिंदे यांनी असं म्हटलं की, “आता छावा चित्रपट येत आहे, त्यासाठी त्यांनी मला विचारलं होतं. पण त्यांच्या तारखा आणि ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेच्या माझ्या तारखा जुळत नव्हत्या. माझं झी मराठीबरोबर कॉन्ट्रॅक्ट होतं. त्यावेळी मला दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी एका भूमिकेसाठी विचारलं. त्यांनी मला सांगितलं की, एक भूमिका आहे आणि तिथे त्यांनी माझं पोस्टर लावलेलं होतं. अनिल कपूर साहेब होते ते औरंगजेब करणार होते. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज्यांची भूमिका करत होता. त्यात रश्मिका मंदानाही होती. एकूणच सर्व कलाकार होते. तिथे माझाही ‘हर हर महादेव’ या चित्रपटातला फोटो होता. त्यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. माझं दिग्दर्शक म्हणून त्यांच्यावर आणि कलाकार म्हणून त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. शिवाय आमच्यात चांगली मैत्रीही आहे.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “दिग्दर्शकांनी मला “एक दिवसाचे काम आहे” असं म्हटलं. यावर मी त्यांना “मी ही भूमिका का करावी?” असं विचारलं. तर त्यांनी म्हटलं की, “माझी तशी इच्छा आहे”. यावर मी त्यांना असं म्हटलं की, “एक पाहुणा कलाकार म्हणून मी समजून घेईन. पण ती भूमिका म्हणून मी ते का करावी?” तर ते म्हणाले “काय हरकत आहे?”. यावर मी त्यांना असं म्हटलं की, “माझे पत्रकार मित्र, माझी जनता यांचा माझ्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोण आहे. भूमिका सकारात्मक असती तर ठीक आहे. पण भूमिका अगदीच नकरात्मक होती. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती देतो आणि राणी सरकार त्याला हत्तीच्या पायी देतात अशी ती भूमिका आहे. पण मी त्यांना नाही म्हटलं”.