मराठमोळा अभिनेता अंशुमन विचारे घराघरात लोकप्रिय आहे. त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ यांसारखे अनेक विनोदी कार्यक्रम केले. त्याच्या परफेक्ट विनोदाच्या टायमिंगमुळे तो प्रेक्षकांचा आवडता अभिनेता बनला. त्याचप्रमाणे त्याने अनेक नाटकांत आणि चित्रपटातदेखील काम केलं आहे. अंशुमन सोशल मीडियावर सक्रिय असतो. परंतू, सोशल मीडियावर जितकी चर्चा अंशुमनची होत नाही, तितकी चर्चा त्याच्या लेकीची होते. अंशुमन त्याच्या मुलीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. तिच्याबरोबरचा निखळ संवाद, धमाल मजामस्ती करतानाचे खास क्षण अंशुमन विचारे शेअर करत असतो. अशातच आता त्याने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (anshuman vichare anvi birthday special video)
नुकताच ३१ डिसेंबर रोजी अंशुमनची मुलगी अन्वीचा वाढदिवस झाला आणि लेकीच्या याच वाढदिवसानिमित्त त्याने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “31st अन्वीचा वाढदिवस, सगळं जगच साजरा करतो माझ्या पिल्लाचा जन्मदिन. तिच्यासाठी काहीतरी खास करायची धडपड नेहमीच माझी आणि माझ्या बायकोची असते. दरवर्षी तिला हवा तसा तिचा वाढदिवस साजरा केला जातो आणि तिच्या कल्पना नेहमीच थोड्याश्या वेगळ्या आणि खूपच साध्या असतात. आम्हाला नेहमीच त्याचं खूप कौतुक वाटतं. पण यावर्षी जेव्हा तिला विचारलं, “तुला वाढदिवस कसा साजरा करायचा आहे? घरी की हॉल मध्ये? की कुठे रिसॉर्टवर जाऊया. त्यावर तीच उत्तर होतं, आपण कोकणात जाऊया का?”
यापुढे त्याने या कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “कोकणात जाऊया आणि पणजी आजीला भेटूया, मामा आजोबा, रत्नागिरीची आजी आणि मग चिनू दीदी… आणि हे ऐकून इतकं भारी वाटलं की, काय सांगू… ४ दिवस संगमेश्वर, रत्नागिरी आणि मग मालवण असा गाडीने प्रवास करुनसुद्धा न थकता तिने कोकणात इतकी धमाल केली. हे पाहून ऊर भरून आला आणि निघताना पुढल्या वर्षी पुन्हा इथेच येऊ असं तिचं वाक्य होतं. खूप मोठी हो बाळा. जगात कुठेही राहा, पण आपल्या माणसांना आणि आपल्या मातीला असाच जीव लाव”.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla मध्ये लीलाच्या जुन्या मित्राची एन्ट्री, लीला-एजेच्या प्रेमाला नवं वळण, मोठा ट्विस्ट
दरम्यान, अंशुमनच्या या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी त्याच्या लेकीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, “खूप मोठी हो अन्वी बाळा”, “इतक्या लहान वयात इतकी चांगली समज”, बाळाला अनेक आशीर्वाद”, “अंशुमनची लेक खूपच समजूतदार आहे”. अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी अंशुमनच्या लेकीच्या या समजूतदारपणाबद्दल अभिनेत्याचे कौतुकही केलं आहे.