बॉलिवूडसह मराठी सिनेविश्वाला आपल्या अभिनयाने ‘वेड’ लावणारा ‘लयभारी’ अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात रितेश देशमुखने दिग्दर्शन केलेला त्याचा ‘वेड’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या सिनेमाद्वारे दिग्जर्शनात पदार्पण केले तर जिनिलिनाने मराठी सिनेविश्वात. त्यामुळे दोघांसाठीही हा चित्रपट खास होता आणि तो खास ठरलाही! चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अगदी तगडी कमाई केली. या चित्रपटात रितेश व जिनिलिया यांच्याबरोबरच अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे व जिया शंकर या कलाकारांनीदेखील प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटानं तेव्हा रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ या चित्रपटाला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
उत्तम कलाकार, उत्तम अभिनय, उत्तम संगीत, उत्तम कथानक व उत्तम दिग्दर्शननाने सर्वांना वेड लावणाऱ्या ‘वेड’ चित्रपटावेळी पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे वितरक किंवा स्टुडिओ नसल्याचा खुलासा रितेशने केला आहे. नुकतीच त्याने ‘इन्स्टंट बॉलिवूड’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने याबद्दल खुलासा केला. यावेळी त्याने चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाल्यानंतरदेखील कुणी मागे उभं राहिलं नव्हतं असं म्हटलं.
याबद्दल रितेशने असं म्हटलं की, “‘वेड’ चित्रपटाचे सर्व शूटिंग वगैरे झालं होतं आणि शेवटच्या क्षणी सर्वांनी माघार घेतली. आम्ही चित्रपट तर बनवला होता आणि आमच्या चित्रपटाचा प्रोमोददेखील प्रदर्शित झाला होता. पण तेव्हा आमच्या मागे कोणताही स्टुडिओ किंवा चित्रपट वितरक उभा राहिला नव्हता. याच चिंतेत आम्ही होतो. त्यामुळे आम्हाला आमचा चित्रपट प्रमोट पण करायचा होता आणि तो लोकांपर्यंत पोहोचवायचादेखील होता. त्याचवेळी आम्ही हा निर्धार केला की ठीक आहे आता जे काय आहे आपणच करु. देव बघून घेईन जे काही आहे ते. मग आम्हीच आमचा चित्रपट प्रमोट केला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला. यासाठी मी देवाचे आभार मानतो”.
आणखी वाचा – “आज बाबा असते तर…”, अभिनय बेर्डेने व्यक्त केली खंत, आठवणीत भावुक होत म्हणाला, “माझ्यात तो गुण…”
यापुढे त्याने असं म्हटलं की “इतक्या मोठ्या संख्येने लोक चित्रपट बघायला आले. हे आमच्यासाठी खूपच धक्कादायक होतं. खरंच या सर्वांसाठी मी देवाचा कायम आभारी असेन. कारण मी माझ्या संपूर्ण करिअरमध्ये असं कधीच पाहिलं नव्हतं. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यात मला चित्रपटगृहातून एका व्यक्तीचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं की आता ९ चा शो संपला आहे. पण तरी लोक बाहेर उभे आहेत आणि त्यांना हा चित्रपट पाहायचा आहे. मग मी त्याला म्हटलं की, ठीक आहे शो सुरु करा. लोकांना १२ ते ३ पर्यंत बघायचा असेल तर बघूदे आणि मग तो शो रात्री १२ ते पहाटे ३ पर्यंत चालू होता”.