मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांना ओळखले जाते. हेमंत व क्षिती यांनी २०१२ मध्ये एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. मनोरंजनसृष्टीत काम करता करता ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी एकमेकांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या लग्नाला जवळपास १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच हेमंतने त्याच्या लग्नाबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत त्याला कधीही बायको नको असल्याचे म्हटलं. तसंच त्यांच्या नात्यात चांगली मैत्री असल्याचेही त्याने सांगितले. (Hemant Dhome on her friendship with wife Kshiitee Jog)
याबद्दल हेमंतने असं म्हटलं की, “मला कधीच बायको नको होती. मला मैत्रीण हवी होती. म्हणजे माझ्या माथी जर बायको आली असती तर मला माझं आयुष्य कंटाळवाण झालं असतं. त्या बायको म्हणून अपेक्षा, मग आपण नवऱ्यासारखं वागा. मैत्रीण हेच पहिल्यापासून अपेक्षित होतं आणि आता लग्नाला १२ वर्षे झाली आहेत. तर आमची मैत्री अजून घट्ट झाली आहे. अजून एकमेकांकडून अपेक्षा नसलेली मैत्री झाली आहे आणि ही मैत्री अजूनच हळूहळू वाढत आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की आमचा लग्नानंतरचा रोमान्स अधिक वाढला आहे. लग्नाआधी आमच्यात रोमान्स नव्हताच की काय असं वाटतं”.
आणखी वाचा – अक्षरा आई होणार असल्याचं सत्य भुवनेश्वरीला समजणार, अधिपतीशी बोलण्यासाठी धडपड, एकत्र कधी येणार?
यापुढे हेमंतने असं म्हटलं की, “आता हो रोमान्स दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे आमच्या मैत्रीत काहीही लपवाछपवी नाही. आम्ही सर्व गोष्टी एकमेकांना सांगतो. हे लोकांना खोटं वाटेल. आम्हाला तिसरा व्यक्ती येऊन असं नाही शकत की, तुला माहीत आहे हेमंतने असं असं केलं किंवा असं असं बोलला. हे तिला कुणीही येऊन सांगणार नाही आणि माझ्याकडेही कुणी येऊन सांगणार नाही. कारण आम्हीच हे एकमेकांना सांगून झालेलो असतो. आम्हीच एकमेकांशी प्रत्येक गोष्टीबद्दल खूप बोलतो. त्यामुळे ही मैत्री महत्त्वाची आहे असं मला वाटतं”.
दरम्यान, क्षिती हेमंतपेक्षा ३ वर्षाने मोठी आहे. व्यावसायिक आयुष्यात तिची सुरुवात हेमंतच्या आधी झाली. १० डिसेंबर २०१२ मध्ये त्यांनी पुण्यामध्ये लग्न केले आणि खर्या अर्थाने संसाराला सुरुवात झाली. कलाक्षेत्र, आपापली कामं आणि घर या सगळ्याचा तोळ संभाळत हे दोघे त्यांचा संसार करत आहेत. लवकरच त्यांचा फसक्लास दाभाडे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.