बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्या गाण्यांचे अनेक चाहते आहेत. त्याने आजवर अनेक गाणी गायली आहेत. मात्र त्यांच्या गाण्यापेक्षा ते त्यांच्या वक्तव्यांमुळे ते अधिक चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सलमानवर निशाणा साधत त्याला चांगलच सुनवलं आहे. अभिजित यांनी एकीकडे शाहरुखला स्टारडमसाठी दुसऱ्यांचा वापर करणारा अभिनेता असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे सलमानला त्यांच्या द्वेषाच्याही लायकीचा नसलेला अभिनेता असं म्हटलं आहे. अशातच आता अभिजीत यांनी ए. आर. रहमान यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी रहमान यांच्या गाण्याबद्दल भाष्य केले आहे. (abhijeet bhattacharya on a r rahaman)
अभिजीत यांनी रहमान यांच्याबरोबर खूप कमी काम केले आहे. त्यांनी रहमान यांच्याबरोबर काम करताना चांगला अनुभव नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी सोनाली बेंद्रेवर चित्रित झालेल्या ‘ए नाझनी सुनो ना’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, “त्यावेळी मला अनेक संगीतकारांकडून कॉल येत होते. अनु मलिक, आनंद-मिलिंद, जतिन-ललित यांनी कॉल करत होते. मी डबिंगमध्ये व्यस्त होतो. मी रहमान यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो होतो”.
पुढे ते म्हणाले, “पण मी खूप वाट बघितली. आम्ही पहाटे २ वाजता रेकॉर्डिंग करणार असल्याचे मला सांगितले. त्यावेळी मी म्हणालो की मी वेडा आहे का? मी झोपलो होतो. मी सकाळी गेलो पण ते त्यावेळी तिथे नव्हते. त्यांना नियमित वेळेत काम करण्याची सवय नव्हती. मी एकदम शिस्तबद्ध पद्धतीने काम केले आहे. पण कलाकृतीच्या नावाखाली साडेतीन वाजता काम करण्याची पद्धत मला पटत नाही”.
दरम्यान याआधी सलमानवरदेखील भाष्य केले होते. एका युट्युब चॅनल दिलेल्या मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्य यांना विचारण्यात आलं की त्याचं सलमानबरोबर कसं नातं आहे? यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “मला नाही वाटत की तो माझ्या द्वेषाच्याही लायकीचा आहे. सलमानला मी माझ्या रागाचाही लायकीचा समजत नाही. त्याला जे काही मिळालं आहे ते सगळं त्याला आशीर्वादांमुळे मिळालं आहे. तो सगळ्यांच्या प्रार्थनांमुळेच पुढे जात आहे”. अभिजीत यांनी पुढे सांगितलं की सलमानला असं वाटतं की तो आता देव बनला पण ते तसं नाही आहे”. अभिजीतच्या या वक्तव्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते.