Abhijeet Shwetchandra Shares Goodnews : काही दिवसांपासून मराठी कलाविश्वातून कलाकार मंडळी आनंदाची बातमी शेअर करत आहेत. अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. तर काहींनी आई-बाबा झाली असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने त्याला लेक झाली असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. थेट बारशाचे फोटो पोस्ट करत त्याने लेकीचं नाव उघड केलं आहे. यानंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. हा अभिनेता म्हणजे अभिजीत श्वेतचंद्र. इन्स्टाग्रामवर हटके व्हिडीओ शेअर करत या अभिनेत्याने तो लवकरच बाबा होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
२६ जानेवारीला सकाळी “काहीतरी गुडन्यूज आहे, ओळखा काय असेल?” अशी इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. त्यानंतर अभिनेत्याने एक व्हिडीओ शेअर करत बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. अभिजीत आणि त्याची पत्नी सेजल या दोघांनी ही गुडन्यूज एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत व सेजल दोघंही चहा/कॉफी पित, वृत्तपत्र वाचत बसल्याचं पाहायला मिळत आहे. या वृत्तपत्रावर ‘द प्रेग्नन्सी पोस्ट’ असं शीर्षक दिलं असून त्या खाली ‘बेबी श्वेतचंद्र Coming Soon’ असं लिहिल्याचं पाहायला मिळत आहे.
अभिजीत व सेजल यांनी Twinning करत ही गुडन्यूज दिली आहे. दोघांच्या या हटके सिनेमॅटिक व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. दोघांनी ही गुडन्यूज देताच चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून अनेक कलाकार मंडळी त्याच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिजीत व सेजल यांनी २४ फेब्रुवारी २०२३ रोजी कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. आता हे दोघंही आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
आणखी वाचा – सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिस पश्चिम बंगालमध्ये दाखल, हल्लेखोराला मदत करणाऱ्याचा घेणार शोध
‘स्टार प्रवाह’वरील ‘नवे लक्ष्य’, ‘शुभविवाह’ या मालिकांमधून तो घराघरांत पोहोचला. त्याने ‘बापमाणूस’, ‘सुभेदार’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या अभिजीत ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.