बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर तो आता सुखरूप घरी पोहोचला आहे. मात्र अद्याप त्याच्यावरील हल्लेखोराची चौकशी सुरु आहे आणि याबद्दल पोलिसांना दररोज नवनवीन अपडेट्स मिळत आहेत. हल्लेखोराला पकडल्यानंतर आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहे. १५ जानेवारीच्या रात्री सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या आरोपी शरीफुल इस्लाम शहजादला अटक केल्यानंतर आता त्याला २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Saif Ali Khan attack case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असू शकतो. आरोपी शरीफुल इस्लाम हा बांग्लादेशातून बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाल्यानंतर काही दिवसांपासून कोलकात्यात राहत होता. याप्रकरणी आणखी एका संशयिताच्या शोधात मुंबई पोलीस पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहेत. आरोपींना सीमकार्ड देणाऱ्या खुकुमोनी जहांगीर शेख याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस तपासात आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. त्यानुसार आरोपी शरीफुल इस्लामबरोबर हल्ला करण्यासाठी आणखी काही आरोपी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच मुंबई पोलिसांनी सैफच्या घरातून ५० हून अधिक बोटांच्या ठशांचे नमुने घेतले असून ते चाचणीसाठी प्रयोगशाळेतही पाठवले आहेत. मात्र, आरोपींच्या बोटांचे ठसे जुळतात की नाही, याबाबत पोलिसांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही.
दरम्यान, १६ जानेवारीला सकाळी सैफ अली खानवर अनेक वेळा हल्ला करण्यात आला. लीलावती रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात सैफला पाच ठिकाणी दुखापत झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यामध्ये त्याची पाठ, मनगट, मान, खांदे आणि कोपर यांचा समावेश आहे. यानंतर शस्त्रक्रिया करुन त्याला २१ जानेवारी रोजी डिस्चार्ज मिळाला. सैफची प्रकृती आता स्थिर असली तरी अभिनेत्याला महिना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.