आई आणि मुलांचं नातं हे कायमच खास असतं. प्रत्येक मुलासाठी आपल्या आईबद्दल मनाच्या कोपऱ्यात एक हळवा कोपरा असतो आणि हाच हळवा कोपरा रिकामा झाला तर होणारे दु:ख हे न् भरुन येण्यासारखे असते. असंच काहीसं झालं आहे अभिनेता आस्ताद काळेबरोबर. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याला मातृशोक झाला होता. या घटनेनंतर भावूक आस्तादने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. आस्ताद आणि त्याच्या आईचे नाते हे खुपच घट्ट होते. आस्ताद त्याचे पुर्ण नाव लिहितांनाही आईचे नाव लावतो. त्यामुळे आईच्या जाण्याने आस्तादने फेसबुकवर दोन पोस्ट केल्या होत्या. त्यापैकी एका पोस्टमध्ये “ती गेली… तेव्हा…” तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये “…म्हणुनी …घनव्याकुळ मी रडलो नाहीये अजून” असे म्हटले होते.
आस्तादने कायमच त्याचे आईवरील प्रेम हे सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले आहे. अनेकदा त्याने त्याच्या आईबरोबरचे खास फोटो शेअर करत त्याच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. अशातच आज आस्तादच्या आईचा वाढदिवस आहे आणि आईच्या वाढदिवसानिमित्त आस्तादने आईच्या आठवणीत एक पोस्ट खास पोस्ट शेअर केली आहे. या फोटोला त्याने तुझे सब पता है ना मां’ हे गाणं लावलं असून या खास फोटोखाली त्याने “या गाण्यात जे आहे, ते सगळं भूतकाळात म्हणावं लागतं आहे. याचं दुःख आहेच. पण ते वर्तमान आणि भविष्यातही लागू होणार आहे गं” असं म्हटलं आहे.
या फोटोबरोबरच त्याने आईला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. या फोटोमध्ये आस्ताद आणि त्याची आई फोटोमध्ये छान स्माईल करत आहेत. या फोटोखाली मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शर्मिला शिंदे, मेघा धाडे, ऋतुजा देशमुख, मेघना एरंडे, माधव देवचके, संग्राम समेळ अशा अनेक कलाकारांनी आस्तादच्या या फोटोखाली आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच आस्तादच्या आईला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.
दरम्यान, मराठी मालिका, चित्रपट व नाटक अशा तीनही माध्यमांत काम करत त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’मुळे अभिनेता चांगलाच नावरुपाला आला. तसेच त्याची ‘पुढचं पाऊल’ ही मालिकादेखील चांगलीच लोकप्रिय झाली होती.