मराठीमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘चंद्रमुखी’. ‘चंद्रमुखी’ चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत होती. तिच्या कामाचं व नृत्याचं विशेष कौतुकही झालं. पण ‘चंद्रमुखी’ची चर्चा सुरु असताना आणखी एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे मानसी नाईक. या चित्रपटासाठी मुख्य भूमिका मानसीला ऑफर करण्याता आली होती यावरुन बराच वाद रंगला. यावर मध्यंतरी तिने भाष्यही केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मानसीने या वादावर पुन्हा वक्तव्य केलं आहे.
भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये मानसीला ‘चंद्रमुखी’बाबत विचारण्यात आलं. यावेळी मानसी म्हणाली, “जेव्हा विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ चित्रपट बनवला जाणार अशी चर्चा होती तेव्हा ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यावेळी मी, विश्वास सर आणि सुबोध सर आम्ही तिघेहीजण बोलत होतो. दरम्यान ‘चंद्रमुखी’चा विषय सुरु होता. त्यावेळी सुबोध भावे सर ‘चंद्रमुखी’चे दिग्दर्शन करणार होते”.
“ते म्हणाले होते, ‘माझी चंद्रमुखी तू!’. हा संपूर्ण प्रकार मी एका मुलाखतीत कोणाचेही नाव न घेता सांगितला होता. त्यावेळी एका वेगळ्याच वादाला सुरुवात झाली. आज मी स्पष्टच सांगते की, मला प्रसाद ओक किंवा प्लॅनेट मराठीने केव्हाच ‘चंद्रमुखी’साठी विचारलं नव्हतं. हा विषय खूप आधीचा होता. तेव्हा दिग्दर्शक-निर्माते वेगळे होते”.
“‘चंद्रमुखी’च्या टीमने माझं नाव घेऊन यानंतर माझी प्रचंड खिल्ली उडवली. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. ज्या व्यक्तीने खिल्ली उडवली त्या व्यक्तीने माझ्याबरोबर काम केलं होतं. त्या व्यक्तीने मला स्वत: हे सगळं विचारण्यासाठी फोन केला. मला ती फोनवरती खूप बोलली. मला याचं वाईट वाटलं. मी तिची खूप मोठी चाहती होते. त्यादिवशी तिने तिची चाहती गमावली. मी त्या व्यक्तीचं आता नाव घेणार नाही.” असं मानसीने सांगितलं.