Nirmal Benny Passed Away : मल्याळम सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अभिनेते निर्मल बेनी यांचे २३ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने सर्व चाहत्यांना धक्का बसला. निर्मल बेनी असं त्यांचं नाव असून ते ३७ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचे वृत्त समोर येत आहे. निर्मल बेणी यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या अनेक चाहत्यांना व निकटवर्तीयांना मोठा धक्का बसला आहे. तसंच त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. निर्मल बेनी यांच्या निधनाची बातमी त्यांचे जवळचे मित्र आणि निर्माता संजय पडियूर यांनी दिली. (Nirmal Benny Passed Away News)
सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. संजय यांनी सोशल मीडियावर मित्रासाठीची भावुक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. निर्मल बेनी यांच्या निधनाची दुःखद माहिती देत संजय या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी असं म्हटलं आहे की, “माझ्या प्रिय मित्राला निरोप देताना… ‘आमेन’मधील कोचाचनची भूमिका आणि त्याने माझ्या ‘दूरम’मध्ये साकारलेली महत्त्वाची भूमिका खूप गाजली. पण आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. माझ्या प्रिय मित्राच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना”.
निर्मल बेनी हे प्रतिभावान अभिनेते होते. कॉमेडियन म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली आणि अनेक स्टेज शो केले. निर्मल बेनी यांना केवळ यूट्यूब व्हिडिओ आणि स्टेज शोच्या माध्यमातून ओळख मिळाली. निर्मल बेनी यांनी डिजिटल मीडियाच्या जगातही आपला ठसा उमटवला होता. निर्मल बेनी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. लिजो जोस पेलिसरीच्या ‘आमेन’ चित्रपटातील कोचाचन (छोटा पुजारी) या भूमिकेने तो प्रसिद्ध झाला.
दरम्यान, २०१२ मध्ये ‘नवगाथरक्कू स्वागतम’ या चित्रपटाने त्यांची फिल्म इंडस्ट्रीतील कारकीर्द सुरू झाली आणि त्यांनी ‘आमेन’ आणि ‘दूरम’सह एकूण पाच चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अकाली निधनाने सिनेसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला असून एक पोकळी निर्माण झाली आहे.