Bigg Boss Marathi 5 : सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाची जोरदार चर्चा सुरु आहे. या घरात सुरुवातीला चाचपडून खेळणारी अंकिता वालावलकर आता आपला खेळ दाखवू लागली आहे. अंकिता वालावलकर ही ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्सदेखील आहेत. ती सोशल मीडियावर विशेष सक्रिय असून ती विविध कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेट अँकर म्हणून तिने जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच रील स्टार म्हणून अंकिताचा सुरु झालेला हा प्रवास ‘बिग बॉस’च्या घरापर्यंत साऱ्यांनी पाहिला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वातील ती पहिली कॅप्टनही झाली होती. या घरात ती तिच्या खेळाने सर्वांचे मन जिंकत आहे. अशातच सोशल मीडियावर अंकिताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या आडनावाबद्दल सांगत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिचं आडनाव इतकं मोठं का आहे? तसंच या नावामागे नेमकी काय रंजकता आहे, ते सांगत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिचं आडनाव प्रभू-वालावलकर असल्याबद्दल सांगत आहे.
या व्हिडीओमध्ये ती असं म्हणत आहे की, “माझ्या जन्म दाखल्यावर वगैरे माझं आडनाव वालावलकरच आहे. बाबांकडचं आडनावचं प्रभू-वालावलकर हे आहे. प्रभू ही दिलेली पदवी आहे. मात्र काही लोकांनी ती प्रभू ही पदवी काढत फक्त वालावलकर आडनाव ठेवलं. पण आम्ही दोन्ही ठेवलं. माझ्या बाबांनी त्यांच्या सर्व कागदपत्रांवर प्रभू-वालावलकर हे पूर्ण आडनाव ठेवलं आहे. पण आम्ही मुलींनी फक्त वालावलकर हेचं आडनाव ठेवलं आहे. पण आता मी पुन्हा प्रभू-वालावलकर हे संपूर्ण आडनाव लावते”.
तसंच या व्हिडीओत ती लग्नानंतरही मी माझे आडनाव बदलणार नसल्याचे सांगते. यावेळी डीपी तिला आडनाव बदलू नकोस असं म्हणतो. यावर ती लग्नानंतर मी माझे आडनाव प्रभू-वालावलकर हेच लावणार असल्याचे म्हणते. गार्डन एरियात अभिजीत, धनंजय, आर्या व निक्की हे बसलेले असताना आर्या अंकिताला तिच्या नावाची पाटी वाचून दाखवते. त्यावरुन अंकिता तिचे आडनाव प्रभू-वालावलकर का आहे? याबद्दल सांगते.
दरम्यान, यंदाच्या पर्वात कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरच्या एण्ट्रीने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. ‘बिग बॉस’ सुरु होण्याआधी अनेक दिवस तिच्या नावाच्या चर्चा होत होत्या. अशातच तिची या घरात एण्ट्री झाली. अंकिता वेळोवेळी घरामध्ये संभाषणाद्वारे आपलं मत मांडताना दिसत आहे. तसेच तिच्याबरोबर इतरांकडून केल्या जाणाऱ्या वर्तणूकीवर ती व्यक्त होताना दिसत आहे.