‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ. मायराने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. या मालिकेतून मायरा घराघरांत पोहोचली. या मालिकेनंतर मायरा सतत चर्चेत असते. अशातच आता मायरा पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळी कारण खूपच खास आहे. मायरा मोठी ताई झाली आहे. तिच्या घरी एका चिमुकल्या बाळाचे आगमन झालं आहे. मायराने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. मायरा वायकुळ मोठी ताई बनली असून तिच्या आईने आणखी एका बाळाला जन्म दिला आहे. (Myra Vaikul Brother Family Cheered)
९ एप्रिलला काही फोटो शेअर करुन मायराने मोठी ताई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच यावेळी वायकुळ कुटुंबात गोंडस बाळाचं आगमन कधी होणार? याचादेखील खुलासा केला होता. त्यानुसार रविवारी वायकुळ कुटुंबात एका गोंडस बाळाचं आगमन झालं. “आमचा छोटा सुपरहिरो आला आहे. आमच्या बाळाला हॅलो म्हणा”, अशी पोस्ट करत मायराने तिच्या लहान भावाची गुडन्यूज दिली आहे. अशातच नुकतीच मायराचे वडील गौरव वायकुळ यांनीही एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. मायराच्या वडिलांनी थेट हॉस्पिटलमधला खास व्हिडीओ शेअर केला असून यात लहान भावाच्या जन्मानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
या व्हिडीओमध्ये मायराचे वडील “मुलगा झाला हो…” असं ओरडत बाहेर येतात. त्यानंतर ते त्यांच्या आईला व मायराला घट्ट मिठी मारत त्यांचा आनंद साजरा करतात. तेव्हा मायरादेखील “मी दीदी झाले” असं आनंदाने ओरडत तिच्या भावाच्या जन्माचा आनंद साजरा करते. यानंतर सर्वजण मायराच्या वडिलांना अभिनंदन् करतात. मायराच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “अभिनंदन”, “मायरा ताई झाली”, “अभिनंदन मायरा तुझी आता मोठी बहीण म्हणून बढती झाली आहे”, “मायराच्या कुटुंबाचं अभिनंदन”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, गुढीपाडवा आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी मायराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत त्यांनी ही गोड बातमी शेअर केली होती. त्यावेळी मायराची आई श्वेता वायकुळ सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार असल्याचं म्हटलं होतं आणि अखेर मायराच्या आईने बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे मायराला भाऊ झाला असून आता मायरा ताई म्हणून मिरवणार आहे.