‘माझा होशील ना?’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. गौतमीने तिची मोठी बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. गेल्या काही वर्षांत आपल्या अभिनयामुळे तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. गौतमी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ही अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय असते. अशातच गेले काही दिवस ती चांगलीचं चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे तिचं लग्न. (Gautami Deshpande And Swanand Tendulkar Sangeet)
मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाची लगबग सुरु आहे. मराठीतील अनेक कलाकार मंडळी एकामागोमाग एक विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतेच मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे हे दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांच्यापाठोपाठ अभिनेत्री-गायिका स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी या दोघांच्या लग्नालाही सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे गौतमी व स्वानंद तेंडुलकर हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. गौतमी व स्वानंद यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अद्याप कुठेही काही सांगितले नव्हते. पण गौतमीची बहीण मृण्मयीने त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केल्यामुळे त्यांच्या रिलेशनविषयी व लग्नाविषयी साऱ्यांनाच खबर लागली. अशातच शनिवारी (२३ डिसेंबर) रोजी गौतमीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे मेहेंदी सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत अप्रत्यक्षपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली.
नुकताच या जोडीचा हळदी समारंभ दणक्यात साजरा झाला. याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि काल (२४ डिसेंबर) रोजी या जोडीने त्यांच्या संगीत सोहळ्यात एकमेकांबरोबर ठेका धरला. स्वानंद-गौतमीने या संगीत सोहळ्यात एकमेकांबरोबर रोमॅंटिक डान्स केला. त्यांच्या या रोमँटिक डान्समुळे उपस्थितांच्या नजरा या जोडीवर खिळून राहिल्या होत्या.
आणखी वाचा – म्हावऱ्याचा बेत अन् शाकाहारी मेजवानी; मुक्ता-सागरच्या केळवणाची अलिबागमध्ये जय्यत तयारी
गौतमी-स्वानंद यांनी त्यांच्या या खास संगीत सोहळ्यासाठी विशेष लूक केला होता. गौतमीने पांढऱ्या शुभ्र रंगाचा मोठा ड्रेस परिधान केला होता, तर स्वानंदने पांढऱ्या रंगाचा फॉर्मल शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट व त्यावर साजेसा ब्लेझर परिधान केला होता. या खास संगीत लूकमध्ये स्वानंद-गौतमीचे तेज खूपच खुलून दिसत होते. गौतमीच्या संगीत सोहळ्यातील हे खास क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी या फोटो व व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला. त्याचबरोबर त्यांचे अनेक चाहते हे दोघे विवाहबंधनात कधी अडकणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.