‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून सर्वांना खळखळून हसवणारे लेखक व अभिनेते म्हणून समीर चौघुले यांना ओळखले जाते. त्यांच्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात त्यांचं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. या कार्यक्रमाला आतापर्यंत अनेक दिवस झाले असूनही या शोची व या शोमधील कलाकारांची लोकप्रियता व प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. या शोची लहानापासून ते अगदी वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाच्या मनात प्रचंड क्रेझ असल्याचे पाहायला मिळत आहे आणि ही क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. (Samir Choughule On Instagram)
समीर चौघुले यांनी केवळ विनोदीच नव्हे तर आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आजवर अनेक मालिका व चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील या शोचे चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांनी समीर चौगुले यांचे पाय धरतानाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम हेदेखील या शोचे चाहते असल्याचे समोर आले आहे. समीरने प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्याबरोबरचा एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. सोनू निगम यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत या फोटोवर समीरने “जेव्हा इतका मोठा प्रतिभावान व हरहुन्नरी कलाकार जेव्हा ‘मी तुम्हाला ओळखतो, मी तुम्हाला पाहिलं आहे’ असं म्हणतो. तेव्हा कलाकार म्हणून खरंच खूप भारी वाटतं” असं म्हटलं आहे.
सोनू निगम यांना भेटणे हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण असल्याची भावनादेखील त्याने यावेळी व्यक्त केली आहे. दरम्यान, समीर चौघुले यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ते सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून मनोरंजन करतात. त्यांचे स्किटस हे चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरतात. दरम्यान, ‘चंद्रमुखी’, ‘बॉइज-३’ या चित्रपटांनंतर त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे अनेक चाहते आतुर असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे.