‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने गेली ४-५ वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांनी या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारावर प्रेम केले आहे. या कार्यक्रमामधील प्रत्येक कलाकार आणि त्या कलाकाराने साकारलेले पात्र चाहत्यांच्या विशेष आवडीचे झाले आहेत. एखाद्या लोकप्रिय पात्राचे स्किट बरेच दिवस सादर झाले नाही, तर प्रेक्षक सोशल मीडियाद्वारे त्या पात्राविषयी विचारणा करताना दिसतात. हास्यजत्रा मधील अनेक लोकप्रिय पात्रांपैकी एक खूप लोकप्रिय पात्र म्हणजे ‘लॉली’. (Namrata Sambherao On Instagram)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील नम्रता संभेराव ही अभिनेत्री ‘लॉली’ हे पात्र साकारते. सचिन गोस्वामी व प्रसाद खांडेकर यांच्या लेखणीतून लॉली हे पात्र साकारले गेले असून अभिनेत्रीने तिच्या अभिनयामुळे हे पात्र आणखी फुलवले आहे. त्यामुळे या पात्राची सोशल मीडियासह अनेक प्लॅटफॉर्म्सवर लोकप्रियता पाहायला मिळते. सोशल मीडियावर लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांमध्ये या लॉली पात्राची क्रेझ पाहायला मिळते. अशातच नम्रता संभेरावच्या लॉली या पात्राचा आणखी एक् व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नम्रताने तिच्या सोशल मीडियावर हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी तिच्या लॉली पात्राचे एक आगळेवेगळे प्रहसन केले आहे. यात ती एक शिक्षिका झाली असून शिक्षिकेच्या भूमिकेद्वारे तिने लॉली हे पात्र साकारले आहे. नम्रताची हुबेहूब नक्कल करत तिने हे प्रहसन सादर केले आहे. या व्हिडीओमधील ही मुलगी नम्रताची भाची असल्याचे म्हटले जात आहे. नम्रताने हा व्हिडीओ शेअर करत याखाली असे लिहिले आहे की, “निरागसता, माझी माऊ किती मोठी झाली मावशीचा अभिनय करायला लागली. तू खूप भारी काम केलं आहेस. खूप मोठी हो”
दरम्यान, नम्रताने शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी “खूप छान, एक नंबर, किती गोड, जबरदस्त, खूपच कमाल, अगदी छोटी नम्रता वाटतेय” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओमधील मुलीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अनेक हसण्याचे इमोजीद्वारे त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचेही म्हटले आहे.