बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा सोशल मीडियावर खूप मोठा फॅन-फॉलोविंग आहे. विद्या बालनच्या अभिनयाचेही जगभरात चाहते आहेत. अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अभिनेत्री नेहमीच गमतीशीर व्हिडीओ शेअर करताना दिसते. सोशल मीडियावरील विद्या बालनचा बहुसंख्येने असलेला चाहता वर्ग पाहून तिच्यासारखे बनावट खाते तयार करुन कोणीतरी लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलं आहे. जेव्हा अभिनेत्रीला याची माहिती मिळाली तेव्हा तिने बनावट खात्याविरोधात एफआयआर दाखल केला. (Vidya Balan Filed FIR)
सोशल मीडिया व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात, कोणत्याही व्यक्तीचे बनावट खाते तयार करणे आणि त्याचा वापर फसव्या कारवायांसाठी करणे कठीण काम नाही. पण विद्या बालनसारख्या प्रसिद्ध कलाकारासह असे घडते तेव्हा सर्वसामान्यांच्या गोपनीयतेवरही प्रश्न निर्माण होतो. काही काळापूर्वी ‘फ्री प्रेस जर्नल’ने वृत्त दिले होते की, अज्ञात व्यक्तीने चुकीच्या कृत्यांसाठी विद्या बालनचे बनावट इंस्टाग्राम व gmail खाते तयार केले होते.
ही घटना अभिनेत्रीच्या एका जवळच्या व्यक्तीने तिच्या निदर्शनास आणून दिली. स्वतः विद्या असल्याचा दावा करणाऱ्या कोणीतरी तिला व्हॉट्सॲपवर मेसेज करुन संवाद साधला होता. विद्याच्या परिचितांनी तिच्याशी याबद्दल चर्चा केली तेव्हा अभिनेत्रीने लगेचच स्पष्ट केले की, तिने त्याच्याशी संपर्क साधला नाही किंवा ज्या क्रमांकावर तिच्याशी संपर्क साधला तो तिचाच होता.
अभिनेत्रीने माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (आयटी ॲक्ट) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी, १९ फेब्रुवारी रोजी, तिची व्यवस्थापक अदिती संधू यांच्यामार्फत, तिने बनावट Gmail (vidyabalanspeaks@gmail.com) आणि Instagram खाते (vidya.balan.pvt) तयार करुन लोकांची फसवणूक केल्याबद्दल फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हेगार १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान विद्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत होता आणि नोकरीच्या ऑफरबाबत खोटी आश्वासने देत होता.





